सुधाकर काशीद कोल्हापूर
मालवणजवळ राजकोटला उभा केलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा आठ महिन्यात पडला आणि पुतळा कसा उभा करू नये, याचा अतिशय वाईट संदेशच सर्वांना त्यातून मिळाला. पण पटणार नाही.., कोल्हापूरचा मानबिंदू असलेला छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त वीस दिवसांत उभारला गेला आहे. आज 79 वर्षे झाली, तो त्याच थाटात उभा आहे. हा पुतळा उभारण्यासाठी त्यात तांबे, जस्त, कथिल याचा तप्त रस जरूर ओतला आहे. पण वीस दिवसांत आपल्या शिवरायांचा पुतळा उभा करायचाच, म्हणून शिल्पकार व कोल्हापूरच्या कसबी कारागिरांनी त्यात जीव ओतल्यामुळेच हे शक्य झाले आहे आणि आज 79 वर्षे झाली पुतळ्यावर जणू रोज नवे तेजच चढते आहे. या पुतळ्यासमोरून जाताना प्रत्येकाची मान आदराने झुकतेच, अशी त्याची शान राहिली आहे.
वीस दिवसात पुतळा उभारण्याची जी किमया झाली त्या प्रत्येक दिवसाची त्यावेळचे शिल्पकार कै. शामराव केशव डोंगरसाने यांनी डायरीच लिहिली आहे. एकमेकाला साथ देणारे कलाकार, जुन्या-जाणत्या शिल्पकारांचे मार्गदर्शन, येईल त्या अडचणीला तोंड देण्यासाठी सज्ज असलेली कोल्हापूरची उद्यमनगरी, कसबा बावड्यांच्या कोल्हापूर शुगर मिल्सने कोणतीही मदत करण्यासाठी उघडे ठेवलेले मिलचे वर्कशॉप, अशी गुंफण या पुतळ्यामागे दडली आहे. कोणीही उठावे आपापल्या मर्जीतल्याला शिल्पकार ठरवावे, असला प्रकार शिवरायांचा पुतळा उभारताना किंचितही झाला नाही आणि त्यामुळे हा पुतळा उभा राहिला. अवघ्या 45 हजार रुपये खर्चात, पण अमूल्य अशा कष्टाच्या मोबदल्यात हा पुतळा तयार झाला.
हा पुतळा उभारण्याआधी तेथे ब्रिटिश गव्हर्नर विल्सन याचा पुतळा होता. स्वातंत्र्यसैनिकांनी त्यावर घणाचे घाव घालून तो विद्रूप केला. या पुतळ्dयाच्या जागी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास कोल्हापूर संस्थांनने मान्यता दिली. त्यावर्षी शिवजयंतीला 21 दिवस राहिले असताना वीस दिवसांत पुतळा उभारण्याचे आव्हानच दिले. शिवभक्त भालजी पेंढारकर यांनी त्यात पुढाकार घेतला. शिल्पकार अर्थातच बाबुराव पेंटर. पण ते यादरम्यान मुंबईला गेले होते. त्यामुळे भालजी पेंढारकर 21 एप्रिल 1945 रोजी शिल्पकार शामराव डोंगरसाने यांच्याकडे आले. रिजन्सी कौन्सिलने पुतळा उभारण्यास परवानगी दिल्याचे सांगून तुम्ही सर्व कोल्हापुरातील कलाकार मंडळी तंत्रज्ञांनी हे काम पूर्ण करावे, असे सांगितले. बाबुराव पेंटर मुंबईहून परत येईपर्यंत प्राथमिक कामाला सुरुवात करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या.
ही झाली दुपारी दोनची चर्चा. पाच वाजता ते सर्वजण खरी कॉर्नरला बाबुराव पेंटर यांच्या स्टुडिओत आले. पुतळ्याची प्राथमिक उभारणी करण्यासाठी एक मोठा स्टॅन्ड आवश्यक होता. तसा स्टॅन्ड बाबूराव पेंटर यांच्याकडे होता. पण त्यावर राजकमल चित्रपट प्रोडक्शनच्या बोधचिन्हाचे मॉडेल तयार केले जात होते. अतिशय सुंदर असे ते ‘राजकमल’चे मॉडेल बाबुराव पेंटर यांची मान्यता घेऊन पाडण्यात आले व तेथे शिवरायांच्या पुतळ्याचे प्राथमिक मॉडेल 22 एप्रिल रोजी मातीने लिंपण्यास सुरूवात झाली. सोमवारी फिगर करेक्ट झाली. मंगळवारी पुतळ्यावर वस्त्राचे डिझाईन झाले. बुधवारी बाबुराव पेंटर मुंबईहून आले. त्यांनी क्ले मॉडेल पाहिले. पुतळ्याची मान थोडी वळवली. पोज थोडी बदलली व क्ले मॉडेल फायनल झाले.
तातडीने मुंबईहून स्पेशल ट्रकने प्लास्टर मागवले. पुढच्या कामासाठी मोठी शेड बाबुराव पेंटर यांच्या घरासमोरच उभी केली. भट्टी उभारण्यासाठी शुगर मिल मधून फायर ब्रिक्स आल्या, क्रेन ट्रॉली आली. शिवाजी टेक्निकल स्कूलचा स्टाफ मदतीला आला. धातूचा रस करण्यासाठी भट्टी बांधली. शुगर मिलचे जोशी, माधव माने, बाळकृष्ण पेंटर, म्हादबा मेस्त्राr, देवळे यात झटू लागले. या साऱ्यांवर भालजी पेंढारकर, बाबुराव पेंटर, शामराव डोंगरसाने यांची दिवस-रात्र देखरेख होती.
13 मे 1945 ला शिवजयंती होती. त्यादिवशी पुतळा उभा करायचा होता. आता 19 दिवस पूर्ण झाले होते. 13 मे रोजी सकाळी दहा वाजता पुतळ्याचे उद्घाटन ठरले होते. पण त्या दिवसापर्यंत पुतळा जोडकामासाठी शुगर मिलमध्ये होता. इकडे चौकात गर्दी झाली होती. त्यामुळे पुतळा उद्घाटन दोन तास पुढे ढकलावे लागले व अक्षरश: युद्धपातळीवर काम करून पुतळ्याचे काम पूर्ण केले. पुतळ्याला ट्रकमध्ये चढवून या ट्रकमधून पुतळा चौकाकडे निघाला. वाटेत कसबा बावडा ग्रामस्थांनी लेझीम-हलगीच्या तालावर पुतळ्याला मानवंदना दिली
पुतळा आला…आला.., असे म्हणत-म्हणत पुतळा चौकात पोहोचला. छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने सारा चौक दुमदुमून गेला. पुतळा जागेवरच चबुतऱ्यावर फिट करण्यात आला. आज 79 वर्षे झाली, पुतळा त्याच थाटात त्याच मानात उभा आहे. पुतळ्यावर आजही एक खरका नाही. उलट रोज त्याचे तेज उजाळतेच आहे. शिवाजी चौक म्हणजे कोल्हापूरचे हृदयस्थान झाले आहे आणि या चौकातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे मानबिंदू झाला आहे. पण हा पुतळा उभारण्यासाठी सारे कोल्हापूरकर झटले म्हणूनच हे शक्य झाले आहे. आणि अजूनही अनेक वर्ष हा पुतळा जसाच्या तसा उभा राहील, अशी त्याची भक्कम उभारणी आहे. या पुतळ्याची स्वच्छता, देखभाल छत्रपती शहाजी तरूण मंडळाकडे आहे.