हिंदू जनजागृती समिती व अन्य संघटनांकडून कळंगुट सरपंचाच्या कृतीचा निषेध
फोंडा
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याचे स्थानिक सरपंचांनी काढलेला आदेश म्हणजे पोर्तुगीजधार्जिणी कृती आहे. समस्त भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांचा अवमान कदापी खपवून घेतला जाणार नाही. कळंगुटच्या सरपंचांना पोर्तुगाली फुटबॉलपटू रोनाल्डोचा पुतळा चालतो. मात्र शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या डोळ्यात खुपतो. या कृतीबद्दल सरपंचांनी शिवरायांच्या पुतळ्यासमोर जाहीर माफी मागावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती व अन्य संघटनांनी केली आहे.
रामनाथी येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाच्या स्थळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदत कळंगुट पंचायतीने घेतलेल्या पुतळा हटविण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. यावेळी गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, हिंदू जनजागृती समितीचे गोविंद चोडणकर, स्वराज्य संघटना म्हापसाचे प्रशांत वाळके, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज कुणाल मालुसरे तसेच शिवप्रतिष्ठान व अन्य संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंगळवारी कळंगुटमध्ये जो प्रकार घडला त्यातून शिवप्रेमी व गोमंतकीय जनतेचा उद्रेक दिसून आला. कारण कळंगुट येथे शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्यास गेल्या वर्षभरापासून तेथील पंचायतीकडून अडथळे आणले जात आहेत. यापूर्वी मिरवणुक अडविण्याचे कृत्यही करण्यात आले होते. शिवप्रेमींना यापुढे गृहीत धरता येणार नाही, असा इशारा जयेश थळी यांनी दिला. शिवरायांचा पुतळा बेकायदेशीर असल्याचा दावा कळंगुटचे सरपंच करीत आहेत. मुळात या भागात किती हॉटेल्स, शेक्स तसेच अन्य धार्मिक स्थळे कायदेशीर आहेत, हे तपासून पाहावे असे गोविंद चोडणकर म्हणाले. शिव छत्रपतींचा पुतळा कळंगुट सरपंचांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यांना रोनाल्डो चालतो मात्र शिवरायांचा पुतळा चालत नाही यावरून ते पुरेशे भारतीय झालेले दिसत नाहीत, अशी टीका प्रशांत वाळके यांनी केली. कुणाल मालुसरे व अन्य संघटनांच्या प्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आपल्याच देशात विरोध होणे हे अत्यंत दुर्दैवी व संतापजनक असल्याचे सांगितले.









