पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिले फेर सर्वेक्षणाचे आदेश
जळगाव / प्रतिनिधी :
लम्पी या रोगाची जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 392 जनावरांना लागण झाली असून, 12 जनावरे दगावल्याचे पशु संवर्धन विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर खा. उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आ. अनिल पाटील, शिरीष चौधरी आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ही आकडेवारी फसवी असल्याचा आरोप करताच पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फेर सर्वेक्षणाचे आदेश दिले.
जनावरांवरील लम्पी रोग, जिल्ह्यात मृत पावलेली जनावरे आणि शासनाची उदासीनता यावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत शासनाला धारेवर धरल्यावर पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तातडीने जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात लम्पी रोगाने मृत पावलेल्या जनावरांच्या गावांना भेट दिली. त्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत दिल्या जात असलेल्या माहितीवर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर विखे-पाटील यांनी फेर सर्वेक्षणाचे आदेश दिले.
प्रारंभी जिल्ह्यात 8,46,407 इतके पशुधन असून, जिल्ह्यात लम्पी रोगाने आठ तालुक्यात 29 बाधीत क्षेत्र आहे. यात 90,163 पशूधनाला लसीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात या रोगाने बारा जनावरांचा मृत्यू झालेला असून, यात 8 जनावरे ही रावेर तालुक्यातील असून, 2 धरणगाव तर अमळनेर भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी एक जनावरे असल्याचे सागण्यात आले. बाधित पशूधनावर नियमित उपचार होत असून सावदा रावेर येथील जनावरांचे बाजार पूर्णपणे बंद केले आहेत तसेच या रोगाचा फैलाव होऊ नये, म्हणून आंतरराज्य जनावरांची वाहतुक बंद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.








