कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात चार आणि रज्यात 12 जागांची मागणी केली आहे. जिल्ह्यातील पन्हाळा-शाहूवाडी येथून स्वत: विनय कोरे आमदार आहेत. तर गतनिवडणुकीत हातकणंगलेमधुन अशोकराव माने यांचा थोडक्यात पराभव झाला. या दोन विधानसभा मतदार संघांसह जिल्ह्यातील चंदगड आणि करवीर मतदार संघावरही कोरे यांनी दावा केला आहे.
विधानसभेची निवडणुक तोंडावर आल्याने राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. प्रत्येक इच्छुकाकडून विधानसभेच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. महायुतीचे सहयोगी असणारे विनय कोरे यांनी जिल्ह्यातील करवीर आणि चंदगडवर दावा केल्याने महायुतीमध्ये अडचण निर्माण झाली आहे. चंदगडमधुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश पाटील हे आमदार आहेत. तर करवीरमधून शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मात्र या जागांची मागणी आमदार विनय कोरे यांनी केल्याने महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या स्थापनेनंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चार आमदार निवडुण आले होते. यावेळी कोरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तत्कालीन सरकारला पाठींबा दिला. त्यावेळी अपारंपरिक उर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्रीपदही मिळाले होते. सध्या आमदार कोरे महायुतीसोबत आहेत. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे प्रमुख तीन पक्षांसह अन्य घटक पक्षही आहेत. त्यामुळे आमदार कोरे यांनी मागितलेल्या जागांपैकी किती जागा त्यांच्या पदरात पडणार हे पुढील काळातच स्पष्ट होणार आहे.