मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे गौरवोद्गार : येत्या अधिवेशनात आणणार सौर ऊर्जा धोरण
प्रतिनिधी / पणजी
वीजेच्या बाबतीत स्वंयपूर्ण होण्याच्या दृष्टीने राज्य सरकार वाटचाल करत असून सौर उर्जेच्या स्वरुपात स्वतःची वीज निर्मिती ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गोवा ऊर्जा विकास एजन्सीद्वारे पर्वरी सचिवालय इमारतीवर स्थापन करण्यात आलेल्या ‘40 किलोवॅट सौर उर्जा रूफटॉप ग्रिड टुडे कनेक्ट सिस्टम’चे उद्घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वीजमंत्री सुदिन ढवळीकर, वीज सचिव वाय. राजशेखर, ’गेडा’ संचालक, मुख्य वीज अभियंता स्टीफन, आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.
गोव्यात स्वतःची वीज निर्मिती नसतानाही अखंडित मिळणाऱया वीज पुरवठय़ामुळे अन्य राज्यात वीजेसाठी लोकांचे कसे हाल होतात याची कदाचित गोमंतकीयांना कल्पनाही नसावी. परंतु ती परिस्थिती सदैव तशीच राहील याची शाश्वती नाही. अशावेळी अपारंपरिक उर्जा ही काळाची गरज आहे. सौरउर्जा हा त्यातील सर्वात महत्वाचा स्रोत आहे. सध्या अनेक पारंपरिक उर्जास्रोत संपुष्टात येत आहे. त्यामुळे प्रत्येकाला सौरउर्जेचे महत्व समजू लागले आहे. गोवा सरकारने याच विचारातून सौरउर्जेस प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. याकामी न्यू रिनिव्हेबल इनर्जी डिपार्टमेंट प्रशंसनीय योगदान देत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.
येत्या अधिवेशनात आणणार सौर ऊर्जा धोरण
त्यावेळी बोलताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी, सरकार आपले सौर ऊर्जा धोरण येत्या जुलैमध्ये जाहीर करणार आहे. ते धोरण विधानसभेत ठेवण्यात येईल, त्यामुळे त्यासंबंधी सध्या अधिक तपशील देऊ शकत नाही, असे सांगितले.
ताम्नार वीज प्रकल्प गोव्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे सध्या वीज तुटवडा असलेल्या गोव्याच्या उर्जा क्षमतेत 1200 मेगावॅट वीज जोडली जाणार आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.
गोव्यात एकही वीज निर्मिती प्रकल्प नसल्याबद्दल खेद व्यक्त करताना वीजमंत्र्यांनी ही उणीव भरून काढण्यासाठी सरकार महिन्याभरात सौर उर्जा धोरण तयार करेल आणि त्यानंतरच्या दोन महिन्यांत ते लागू करेल, अशे सांगितले.
राज्य सरकार सौर पॅनेलच्या वापरास प्रोत्साहन देत आहे. शेतकऱयांसाठीही एक योजना तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे त्यांना एकूण खर्चावर 90 टक्के अनुदान देण्यात येते, अशी माहिती ढवळीकर यांनी दिली.
काल उdघाटन करण्यात आलेला अशा प्रकारचा हा 13 वा प्रकल्प असून तो यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.









