पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आश्वासन : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक
बेळगाव : बेळगाव विमानतळावर अनेक विकासकामे राबविली जात आहेत. काही कामांना राज्य सरकारकडून सहकार्य केले जात आहे. विमानतळाच्या विस्तारासोबतच नवीन रस्त्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मदत केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. गुरुवारी विमानतळासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, आमदार असिफ सेठ, आमदार दुर्योधन ऐहोळे, विमानतळाचे संचालक त्यागराज, जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
विमानतळाचा भविष्यात विस्तार होणे गरजेचे
बेळगाव विमानतळाची व्याप्ती वाढत असल्याने भविष्यात विस्तार होणे गरजेचे आहे. यासाठी आणखी 56 एकर जागेची मागणी विमानतळ प्राधिकरणाने केली होती. ही जागा विमानतळाला देण्यासाठी राज्यात सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी विमानतळाच्या इतर विकासकामांबाबत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी माहिती जाणून घेतली.









