पुणे / वार्ताहर :
पुणे-बेंगळूर महामार्गावर पुण्यातील नवले पुलानजिक मध्यरात्री ट्रक आणि खासगी बसचा मोठा अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा बळी गेला असून, 22 जण जखमी आहेत. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी या अपघातग्रस्त ठिकाणाची आज पाहणी केली. यावेळी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने मदत जाहीर करावी. याशिवाय अपघातातील जखमींच्या उपचारांचा खर्चही सरकारने उचलावा, अशी मागणी सुळे यांनी केली.
सुळे म्हणाल्या, मध्यरात्री ट्रक आणि खासगी बसच्या अपघातात 4 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. नवले पुलानजिक अनेक अपघात झाले आहेत. नोव्हेंबर मध्ये मोठा अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे, परंतू त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. या संदर्भात आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
या पुलावरील अपघातांची मालिका थांबावी, यासाठी लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन आणखी सुधारणा कशा करता येतील यावर भर देण्याचा प्रयत्न करणार आहे. संसदेत देखील हा मुद्दा आपण मांडला असून सर्व विभागाशी समन्वय साधून हा रस्ता अपघातमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.








