प्रतिनिधी,कोल्हापूर
‘राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे’ या शिर्षकाखाली प्रसार माध्यमाना दिलेल्या जाहीरातवरून मंगळवारी राजकीय पातळीवर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ही जाहीरात शासनाने दिलेली नाही. मात्र लोकप्रिय मुख्यमंत्री हे माझे एकट्याचे श्रेय नाही. माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व सहकारी मंत्री हे सगळ्यांचे श्रेय असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
कोल्हापुरात शासन आपल्या दारी या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पाठबळ हे आमच्या सरकारला दिले आहे. त्यामुळेच आम्ही 11 महिन्यांत एवढ्या जोमाने काम करू शकलो. अडीच वर्षांपूर्वी बंद पडलेले प्रकल्पांना आम्ही चालना देतोय हे सर्व प्रकल्प करोडो लोकांना दिलासा देणारे आहेत. यामुळेच लोकांनी खऱ्या शिवसेना भाजप सरकारला पसंती दिलेली आहे. हा जनतेचा मोठेपणा आहे. ती जाहिरात सरकारची नाही. मात्र, त्या जाहिरातीपेक्षा लोकांच्या मनातील भावना या माध्यमातून दिसून आलेले आहेत. यापेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही. आम्ही आमचे काम करत राहू. आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही. आरोप जेवढे करतील त्यापेक्षा दुपटीने आम्ही काम करू, शिंदे यांनी सांगितले.








