संतप्त मिऱ्या ग्रामस्थांचा कामाला जोरदार आक्षेप; आमच्या शंकाचे निरसन करा, आमच्यात भांडणे लावलात तर याद राखा…दिला इशारा
रत्नागिरी प्रतिनिधी
मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या सुरू झालेल्या बांधकामावरून पुन्हा एकदा मंगळवारी रणकंदन झाले. पतन विभागाने या बंधाऱ्याचे सादरीकरण ग्रामस्थांसमोर केले. पण त्याला संतप्त ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप घेत आम्हाला नरिमन पॉईटच्या धर्तीवर बंधारा होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्ष आराखडा वेगळा करण्यात आल्याचे सांगून जोरदार धारेवर धरले. तज्ञ अधिकाऱ्यांनी चर्चा करुन आमच्या शंकाचे अगोदर निरसन करा. आमच्या दोन गावांत भांडणे लावून आम्ही एकमेकांची डोकी फोडण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी याद राखा….असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला.
मिऱ्या येथील श्री दत्त मंदिरात पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ग्रामस्थांना सुमारे 190 कोटी रुपयांच्या बंधारा आराखडय़ाचे सादरीकरण दिले. सादरीकरण देताना अधिकाऱयांनी बंधाऱ्यांचा मूळ उद्देश समजावून सांगितला. बंधाऱ्याचा मूळ उद्देश किनाऱ्यावरील जमिनीची धूप रोखणे, किनाऱ्याची निर्मिती करणे, पर्यटनाला चालना देणे, किनाऱ्यावरील घरांची पडझड रोखणे हा आहे. त्यामध्ये धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या काटकोनात आवश्यक त्या लांबेचे सात ग्रोएन्स बांधणे, वेगवेगळय़ा आकारांच्या दगडांची रचना उतारावर टेट्रापॉड बसवून ऍपॉनचे बांधकाम करण्यात येणार आहे. सुमारे 3.400 कि.मी लांबीचा हा बंधारा असून त्यावर पायवाट असणार आहे. बंधाऱ्यावर कोणतेही वाहन जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केल। पण बंधाऱयाबाबत असलेल्या शंकांचे निरसन न झाल्याने यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. सुरुवातीला आम्हाला नरिमन पॉईटच्या धर्तीवर बंधारा होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्ष आराखडा वेगळा करण्यात आला आहे. बंधाऱयाची उंची कमी असून ती वाढवणे आवश्यक आहे. केवळ पावसाळय़ातील भरतीचा अभ्यास न करता वादळात लाटांची वाढती उंची लक्षात घेवून बंधाऱयांचा आराखडा होणे आवश्यक असल्याचे सांगितले.









