कोल्हापूर / विनोद सावंत :
राज्य शासनाने कोल्हापूर मुद्रांक शुल्क विभागास 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 640 कोटींचे वसुलीचे टार्गेट दिले आहे. आतापर्यंत 476 कोटींची वसुली झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ 18 दिवस बाकी असून या दिवसांमध्ये तब्बल 164 कोटींचे वसुली करण्याचे आव्हान आहे.
कोल्हापूर जिल्हा नेहमी मुद्रांक शुल्कामध्ये राज्यातील इतर जिल्ह्यात टॉपवर असतो. गत आर्थिक वर्षामध्ये विक्रमी 532 कोटींची वसुली झाली होती. टार्गेट पेक्षा जास्त वसुली केल्याने शासनाने कोल्हापुरातील या विभागातील तत्कालिन अधिकाऱ्यांचा सत्कारही केला होता. यंदा मात्र, स्थिती वेगळे आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 640 कोटींचे टार्गेट दिले आहे. 12 मार्च अखेर 476 कोटी 2 लाख इतका महसुल जमा झाला आहे. 79 हजार 402 दस्त नोंदणीतून ही रक्कम जमा झाली आहे. टार्गेटच्या तुलनेत ही रक्कम कमी आहे. उर्वरित 18 दिवसांत या विभागाला तब्बल 169 कोटींचा महसूल जमा होणे आवश्यक असून हे टार्गेट पूर्ण करण्याचे आव्हान आहे.
- राज्यातून 54 हजार कोटींची वसुली अपेक्षित
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने गेल्या आर्थिक वर्षात 50 हजार कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा केला होता. गेल्या वर्षी राज्यभरात 27 लाख 90 हजार 121 दस्तांच्या नोंदणीतून हा महसूल जमा झाला होता. यंदा या विभागाला 54 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असून आतापर्यंत सुमारे 41 हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
- 75 टक्के वसुली
कोल्हापूर जिल्ह्यातून मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षात अपेक्षित मुद्रांक शुल्क जमा होताना दिसून येत नाही. कोल्हापूर विभागाला तब्बल 640 कोटींचे वसुलीचे टार्गेट आहे. एप्रिल 2024 ते 12 मार्चपर्यंत 476 कोटी 2 लाख इतका मुद्रांक शुल्क जमा झाला आहे. टार्गेटच्या 75 टक्के वसुली झाली असून गतवर्षीप्रमाणे 100 टक्के वसुली हाण्यासाठी 18 दिवसांत उर्वरीत 169 कोटी वसुली करावी लागणार आहे.
- चार वर्षातील मुद्रांक शुल्क वसुली स्थिती
आर्थिक वर्ष उद्दिष्टे नोंदणी झालेले दस्त वसुली
2021-22 329 कोटी 68878 330 कोटी 26 लाख
2022-23 350 कोटी 86795 456 कोटी 20 लाख
2023-24 525 कोटी 96639 532 कोटी 56 लाख
2024-25 640 कोटी 79402 476 कोटी 2 लाख
- 9 हजार दस्त नोंदणी कमी
गत आर्थिक वर्षामध्ये 96 हजार 639 दस्त नोंदणीतून विक्रमी 525 कोटींचा महसुल जमा होता. 12 मार्च 2024 रोजी 88 हजार दस्त नोंदणी झाली होती. यंदा याच दिवशी 79 हजार दस्त नोंदणी झाली असून 9 हजार दस्त नोंदणी कमी झाली आहे.
- गतवर्षी ऐवढी तरी वसुली होणार काय?
कोल्हापूर मुद्रांक शुल्क विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात 525 कोटींचा महसूल जमा केल होता. यंदा 525 कोटींपर्यंत वसुली होणे आव्हान बनले आहे. विशेष म्हणजे पुढील महिन्यापासून 10 ते 15 टक्के रेडिरेकनरचे दर वाढणार असतानाही मार्चमध्ये अपेक्षित मुद्रांक शुल्क वसुल होताना दिसून येत नाही.
नागरिकांच्या सोयीसाठी मुद्रांक शुल्क विभाग 31 मार्चपर्यंत रात्री उशीरा 8 पर्यंत सुरू ठेवली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विभागात सध्या मुद्रांक शुल्क भरण्यासाठी गर्दी होत आहे. उर्वरीत 19 दिवसांमध्ये टार्गेट पूर्ण करण्याचे प्रयत्न राहिल.
बाबासाहेब वाघमोडे, मुद्रांक जिल्हाधिकारी








