रंगकर्मींनी संबंधित ठेकेदार कंपनीच्या अभियंत्याला धरले धारेवर
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या स्टेजच्या बाजूच्या प्रवेशद्वाराजवळील छत सूचना करुनही चुकीच्या पद्धतीने बांधल्याने रंगकर्मी आक्रमक झाले. त्यांनी याबाबत संबंधित ठेकेदार कंपनीच्या अभियंत्याला धारेवर धरत चुकीचे बांधलेले हे छत उतरविण्यास भाग पाडले. तसेच वोन दिवसात नवीन डिझाईन येईल त्यानुसार येथील छत बांधण्याची सूचना केली.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीचे काम सुरु आहे. नाट्यगृहाच्या स्टेजच्या बाजूस असलेल्या प्रवेशद्वाराजवळील छताची उंची वाढविण्याची मागणी रंगकर्मीनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्याकडे केली होती. येथील छत प्रवेशद्वाच्या उंचीनुसार केल्यास कार्यक्रमादरम्यान साहित्य आणण्यास या छताचा अडथळा होतो. प्रसंगी साहित्य धडकून छतासह साहित्याचे नुकसान होते. त्यामुळे येथील छताची ऊंची वाढविण्यात यावी, अशी मागणी रंगकर्मी यांनी केली होती.
रंगकर्मीची मागणी लक्षात घेता अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांनी संबंधित ठेकेदाराला काम थांबविण्याचे आदेश दिले होते. तरीही संबंधित ठेकेदाराने अतिरिक्त आयुक्त यांनी केलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करत पाच दिवसांपूर्वी एका रात्रीत याबाजूकडील छताचे
काम आहे त्या पद्धतीने केले. यामुळे संतप्त झालेल्या रंगकर्मीनी याबाबतची तक्रार अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांच्याकडे केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अडसूळ यांनी ठेकेदारास येथील छत उतरविण्याची सूचना
केली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून छत उतरविण्याबाबत ठेकेदाराकडून टोलवाटोलवी सुरु होती. मंगळवारी संतप्त रंगकमींनी नाट्यगृहात एकत्र येत ठेकेदार कंपनीच्या अभियंत्याला धारेवर धरले. तसेच चुकीच्या
पद्धतीने उभारलेले छत उतरविण्यास भाग पाडले. यावेळी रंगकर्मी सुनील घोरपडे, रोहन घोरपडे, किरणसिंह चव्हाण, विजय शिंदे, अजय खाडे, प्रणोती कुमठेकर, ओंकार घोरपडे, संचित कुमठेकर, सागर भोसले आदी उपस्थित होते.
ठेकेदाराकडून अरेरावीची उत्तरे
रंगकर्मीनी ठेकेदाराला धारेवर धरत सूचना करुनही चुकीच्या पद्धतीने छत का बांधले अशी विचारणा केली. यावर ठेकेदाराने रंगकर्मीना अरेरावीची उत्तरे दिली. माझा मालक मला ज्या पद्धतीने सांगेल तसेच मी काम करणार, छताच्या बदलाबाबत मला लेखी काही मिळालेले नाही असे उत्तर दिले. यावर संतप्त झालेल्या रंगकर्मीनी येथील काम थांबविण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले होते, मग काम करण्याची गडबड का केली अशी विचारणा करत अभियंत्यास धारेवर धरले.
ठेकेदारांचा मनमानी कराभार पुन्हा उघड
शहरातील सध्या निकृष्ट दर्जाची विकासकामे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर चर्चेत आली आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामास जबाबदार अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी बैठकीत दिले. त्यानुसार प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी फुलेवाडी दुर्घटना, पाणीपुरवठा यावरुन संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन व कारणे दाखवा नोटीस बजावली. ही कारवाई ताजी असतानाच भोसले नाट्यगृहामध्ये अतिरिक्त आयुक्तांनी काम थांबविण्याचा आदेश देवून ठेकेदाराने संबंधित काम एका रात्रीत केल्याने ठेकेदारांचा मनमानी कारभार पुन्हा उघड झाला आहे.









