वृत्तसंस्था/ ग्विकबेरा
येथे सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत लंकेचा संघ पराभवाच्या छायेत वावरत आहे. रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी शेवटची बातमी हाथी आली त्यावेळी लंकेने दुसऱ्या डावात 33 षटकात 5 बाद 122 धावा जमविल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने लंकेला विजयासाठी 348 धावांचे कठिण आव्हान दिले आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 358 धावा जमविल्यानंतर लंकेचा पहिला डाव 328 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 30 धावांची आघाडी मिळवली. दक्षिण आफ्रिकेने 3 बाद 191 या धावसंख्येवरुन आपल्या दुसऱ्या डावाला रविवारी पुढे सुरुवात केली आणि त्यांचा दुसरा डाव 317 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेच्या डावात मार्कक्रेमने 75 चेंडूत 5 चौकारांसह 55 तर कर्णधार बहुमाने 2 चौकार आणि 3 षटकारांसह 66, स्टब्जने 2 चौकारांसह 47, बेडिंगहॅमने 3 चौकारांसह 35, रिक्लेटोनने 3 चौकारांसह 24 धावा केल्या. लंकेतर्फे प्रभात जयसूर्याने 129 चेंडूत 5 गडी बाद केले. विश्वा फर्नांडोने 2 तर आसिता फर्नांडो आणि कुमारा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उपहारानंतर काही वेळातच दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव समाप्त झाला.
लंकेला विजयासाठी 348 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेकडून मिळाले. पण दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा निम्मा संघ 122 धावांत तंबूत परतला. चहापानावेळी लंकेची स्थिती 19 षटकात 2 बाद 60 अशी होती. शेवटच्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर लंकेने आणखी 3 गडी गमाविले. निशांकाने 18, चंडीमलने 29, मॅथ्यूजने 32, कमिंदू मेंडीसने 35 धावा केल्या. केशव महाराज आणि पॅटर्सन यांनी प्रत्येकी 2 तर रबाडाने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – द. आफ्रिका प. डाव 358, लंका प. डाव 328, दक्षिण आफ्रिका दु. डाव 317, लंका दु. डाव 33 षटकात 5 बाद 122.
धावफलक









