विविध साहित्य खरेदीला पसंती, शासकीय सुटीमुळे गर्दी
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील आठ दिवसांपासून दमदार पाऊस सुरू होता. त्यामुळे बाजारपेठदेखील काहीशी विस्कळीत झाली होती. मात्र शनिवारी पावसाने उसंत घेताच बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढली होती. त्याचबरोबर शासकीय सुटी असल्यामुळे कुटुंबासह खरेदीला पसंती देण्यात आली. त्यामुळे बाजारपेठेत आठवड्याभरानंतर गर्दी पहायला मिळाली.
अतिपावसामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला होता. काही भागात रस्त्यांवर पाणी आले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र आता पावसाने उसंत घेतल्याने वाहतूक पूर्ववत झाली असून बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. त्यामुळे बाजारपेठ पुन्हा एकदा बहरलेली पहावयास मिळाली. नागपंचमी 20 दिवस तर राखी पौर्णिमा महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बाजारात सणांचे साहित्यदेखील दाखल होऊ लागले आहे. त्यामुळे खरेदीला वेग येऊ लागला आहे.
गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, कडोलकर गल्ली, मेणसे गल्ली, रविवार पेठ, किर्लोस्कर रोड, कलमठ गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, काकतीवेस, खडेबाजार आदी ठिकाणी नागरिकांची वर्दळ पहायला मिळाली. त्याचबरोबर मोहरमचा सणदेखील शनिवारी असल्याने मुस्लीम बांधवांची लगबग पहायला मिळाली.
शनिवारी पावसाची उसंत आणि शासकीय सुटीमुळे बाजारपेठेत खरेदीला उधाण आले. विशेषत: आठवड्याभरापासून रखडलेली खरेदी करण्याला नागरिकांनी पसंती दिली. भाजीपाला, फळे, पावसाळी साहित्य खरेदी केले. विशेषत: खानापूर, गोवा, चंदगड, आजरा, गडहिंग्लज येथील नागरिकांची वर्दळ वाढली होती. शाळेला सुटी असल्याने काही बालचमू पालकांसोबत खरेदीला आल्याचे दिसून आले.
प्लास्टिकची खरेदी
मागील आठवड्याभरात झालेल्या पावसामुळे प्लास्टिकची खरेदी वाढली आहे. विविध आकारातील ताडपत्र्यांना मागणी अधिक होती. वाहने, झोपडी आणि इतर ठिकाणी पावसाळ्यात ताडपत्र्यांचा वापर अधिक होतो. त्यामुळे नागरिकांनी ताडपत्र्यांची खरेदी केली.









