मंत्री आलेक्स सिक्वेरांनी मागितली माफी
मडगाव : पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी काल सोमवारी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना तमाम गोवेकरांच्या रक्तात सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा ‘डीएनए’ असल्याचे विधान केले. त्यांच्या विधानाचे पडसाद भाजपमध्ये जोरदारपणे उमटले. भाजपचे प्रवक्ते गिरीराज वेर्णेकर यांनी या विधानाला तीव्र हरकत घेताना मंत्री सिक्वेरा असे विधान कसे करू शकतात? असा खडा सवाल उपस्थित केला. आपल्या विधानाचे तीव्र पडसाद भाजपमध्ये उमटल्याने तसेच प्रवक्ते गिरीराज वेर्णेकर यांनी हरकत घेतल्याने, मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सोमवारी रात्री उशिरा आपल्या घरी पत्रकार परिषद बोलावून सर्वांची माफी मागितली. गोवेकर हे शांतताप्रिय आहेत. सर्वजण या ठिकाणी बंधू भावाने राहतात, धार्मिक सलोखा जपला जातोय व हाच डीएनए सर्वांच्या रक्तात असल्याचे आपल्याला म्हणायचे होते. मात्र, सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा डीएनए सर्वांच्या रक्तात असल्याचे उद्गार आपल्या तोंडातून आले. जर यामुळे कुणी दुखावला असेल तर आपण सर्वांची माफी मागतो असे मंत्री सिक्वेरा म्हणाले.