गिरीश चोडणकर यांची उच्च न्यायालयात याचिका
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसच्या 8 फुटीर आमदारांविरोधात सभापतींकडे दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्याचे आदेश सभापतींना देण्यात यावेत अशी मागणी करणारी याचिका काँग्रेस नेते व माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर करून गोवा खंडपीठाचे दरवाजे ठोठावले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व कायद्यानुसार ठराविक मर्यादीत कालावधीत निकाल देण्यात यावा, अशी याचना चोडणकर यांनी याचिकेतून केली आहे.
फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये गोवा विधानसभा निवडणूक व निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे 11 उमेदवार आमदार म्हणून विजयी झाले होते. तेव्हापासून त्या पक्षाचे काही आमदार फुटणार आणि भाजपात जाणार अशी चिन्हे दिसू लागली होती. पहिल्या प्रयत्नात 8 आमदारांची संख्या मिळू शकली नाही म्हणून ते बंड फसले परंतू नंतर पुन्हा प्रयत्न करून 8 आमदारांनी एकत्र येऊन ते भाजपवासी झाले. साधारण 6 महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबर 2022 मध्ये 8 आमदारांनी भाजपात प्रवेश केला.
दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, संकल्प आमोणकर, रूडॉल्फ फर्नांडिस, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि आलेक्स शिक्वेरा या काँग्रेसच्या 8 आमदारांनी फुटून भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या विरोधात सभापतींकडे अपात्रता याचिका प्रलंबित असून काँग्रेस पक्षाकडे आता युरी आलेमांव, अल्टॉन डिकॉस्ता आणि कार्लूस परेरा एवढे तिनच आमदार शिल्लक राहीले आहेत.
चोडणकर यांनी त्या 8 आमदारांच्या विरोधात सभापती रमेश तवडकर यांच्याकडे अपात्रता याचिका सादर केली आहे. त्यावर लवकर सुनावणी घेण्याचे आणि निर्णय घेण्याचे आश्वासन तवडकर यांनी दिले होते. ते त्यांनी पाळले नसल्यामुळे चोडणकर यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून लवकर सुनावणी करण्यासाठी याचिका सादर केली आहे. अशा याचिकांचा निकाल 90 दिवसात लावावा असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला असून. त्यानुसार मर्यादित वेळेत निर्णय करण्याचे निर्देश सभापतींना देण्यासाठी ही याचिका आहे.









