एक व्यापक धोरणात्मक निर्णय म्हणून भारताच्या अंतराळ संचार-संशोधन मोहिमेत अग्रणी भूमिका असणाऱया ‘इस्त्रो’च्या विविध महत्त्वाच्या संशोधन प्रकल्पांमध्ये नवीन, कल्पक व संशोधनपर सक्षम अशा संशोधक-उद्योजक स्टार्टअप कंपन्यांना केवळ समाविष्टच न करता त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या विशेष शासकीय निर्णयाचा परिणाम म्हणजे एकीकडे नव उद्योजक व कल्पक अशा स्टार्टअप कंपन्यांना नवीन संधी उपलब्ध होतानाच, ‘इस्रो’ला नवीन कल्पना व तंत्रज्ञान यांचे विशेष पाठबळ लाभले आहे.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ‘लिओ सॅटेलाईट’ या स्टार्टअपची कामगिरी. लिओच्या यशस्वी पदार्पण पाठोपाठ विशेषतः कोरोनानंतरच्या कालावधीत त्याने घेतलेल्या भरारीमुळे विविध प्रकारची महत्त्वाची माहिती सर्वांपुढे आली. यामध्ये कोरोनानंतर शेतीचे झालेले नुकसान, वातावरणीय बदल, जलपातळी, खाणकाम, उद्योगातील बदल, तेल पाईपलाईनवर झालेले परिणाम याची पडताळणी घेता आली व त्याचे विविध प्रकारे फायदे झाले. मुख्य म्हणजे ‘लिओ सॅटेलाईट’ ची चाचणी पडताळणी सुरुवातीला कॅलिफोर्नियामध्ये करण्यात आली असली तरी यशस्वी चाचणीनंतरचे त्याचे फायदे भारताला विविध संदर्भात झाले.
या आणि नव्या प्रयोगांची पार्श्वभूमी म्हणजे केंद्र सरकारच्या अंतराळ संशोधन मंत्रालयाने घेतलेला महत्त्वाचा व दूरगामी निर्णय. सरकारच्या या निर्णयाच्या परिणामीच ‘इस्रो’ च्या विविध महत्त्वाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी निवडक व सक्षम स्टार्टअपच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यास सुरुवात झाली. यातून विज्ञान-तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान व प्रगतीचे दार कायमस्वरुपी स्टार्टअपसह लघुउद्योजकांना उपलब्ध झाले आहे.
शासकीय स्तरावरील याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘इन-स्पेस’ म्हणजेच इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऍथोरायजेशन’ या स्वायत्त संस्थेची स्थापना दोन वर्षापूर्वी करण्यात आली.‘इस्रो’च्या विशेष गरजांसाठी खासगी क्षेत्रासह स्टार्टअप कंपन्यांना सामावून घेणेच नव्हे तर त्यांच्या प्रस्थापित क्षमतांसह त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारासह सुरू झाले. ‘इस्रो’चे निवृत्त प्रमुख महासंचालक के. सिवन यांच्या मते ‘इस्त्रो’च्या कामाला संशोधनासह गती प्रगती मिळण्यासाठी स्टार्टअप कंपन्यांना विशेष पारख करण्यात आल्यानंतर आवर्जुन सामावून घेण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने व उल्लेखनीय स्टार्टअप म्हणून अग्नीकुल कॉस्पोज, स्कायरुट, पिक्सेल, बेलाट्रिक्स, ऍस्ट्रॉगेट लॅब्ज, गॅलेक्सी आय या स्टार्टअप कंपन्यांचा उल्लेख करायला हवा. या कंपन्या आपल्या संशोधन-तंत्रज्ञानाच्या आधारे रॉकेटस्, प्रक्षेपणासाठी आवश्यक उपकरणे इ. क्षेत्रात यशस्वीपणे काम करीत आहेत. याशिवाय यातील काही कंपन्या आपल्या कामाच्या कक्षा विस्तारित असून त्यामध्ये काही नवे उद्योजक येऊ घातले आहेत.
वरीलपैकी पिक्सेलच्या संदर्भात सांगायचे म्हणजे या स्टार्टअप कंपनीने यापूर्वीच सॅटेलाईटची यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे. याकामी त्यांना गुंतवणूकदारांची वाढीव साथ लाभत आहे. यशस्वी चाचणीनंतर पिक्सेलकडे काही प्रस्थापित कृषी तंत्रज्ञान कंपन्यांनी व्यावसायिक विचारणा केली आहे व त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. यामागचा कृषी कंपन्यांचा मुख्य उद्देश हा वाढत्या पिकांचा मागोवा, शेती पिकांवरील कीड, पिकांचे नुकसान इ.चा त्वरित व अद्ययावत अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना करणे हा आहे. शेती आणि शेतपिकांवर अचानक वा अकल्पितपणे उद्भवणाऱया या संकटांचा वेळेत अभ्यास करणे गरजेचे असल्याने या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी हैद्राबादच्या स्कायरुट या स्टार्टअप उद्योगाने खासगी क्षेत्रात प्रथमच तयार केलेल्या आपल्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण ‘इस्रो’च्या श्रीहरीकोटा या उपग्रह उड्डाण केंद्रावरून केले. स्कायरुटचा हा प्रयोग ‘इस्रो’चे निवृत्त संशोधक व काही नवागत अभियंत्यांनी यशस्वी केला. छोटय़ा अद्ययावत वाहनांसह रॉकेटची निर्मिती या निमित्ताने खासगी क्षेत्रात प्रथमच करण्यात आली हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाला व्यावसायिकतेची साथ दिली जाऊ शकते हे पण यानिमित्ताने स्पष्ट झाले. या प्रयोगाला जागतिक स्तरावर मागणी मिळू शकते असा विश्वास स्कायरुटचे सह-संस्थापक पवन चंदाना यांनी व्यक्त केला आहे.
आपल्या याच व्यावसायिक टप्प्याचा पुढील भाग म्हणून स्कायरुटने व्यावसायिक तत्वावर रॉकेट निर्मिती व प्रक्षेपणाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. या वर्षाअखेरपर्यंत अन्य ग्राहक कंपन्यांच्या सॅटेलाईटचे प्रक्षेपण करण्यापर्यंत मजल गाठण्याचे लक्ष स्कायरुटने आपल्यापुढे ठेवले असून त्यादृष्टीने व्यापक प्रयत्न सुरू आहेत.
भारतीय अंतराळ क्षेत्राशी निगडित स्टार्टअप क्षेत्राने ‘इस्त्रो’शी संबंधित विविध प्रकल्पांवर मुलभूत स्वरुपात व यशस्वीपणे काम करून हे सिद्ध केले आहे की त्यांचे प्रयत्न व संकल्पना या नाविन्यपूर्ण, मूलभूत स्वरुपाच्या असून त्याला व्यावसायिकतेचे पाठबळ आहे. यशिवाय या स्टार्टअप कंपन्या या परस्परपूरक स्वरुपात काम करीत आहेत. परिणामी त्यांच्या प्रयत्नांचे वेगळेपण स्वयंसिद्ध ठरले आहे.
उदाहरणार्थ अग्नीकुल कॉसमॉस व स्कायरुट हे ‘इस्त्रो’साठी काम करणारे स्टार्टअप आहेत. यापैकी स्कायरुटने ‘इस्त्रो’च्या विक्रम तीन प्रकल्पासाठी अवजड वजन वाहनक्षमतेवर काम केले होते. तर अग्नीकुलने त्याला पूरक असे कमी वजन क्षमतेच्या वाहतुकीवर काम केले. या शिवाय उभय स्टार्टअप कंपन्यांनी आपल्या प्रक्षेपण प्रयोगासाठी वेगवेगळय़ा इंधनाचा वापर केला.
याशिवाय तांत्रिकदृष्टय़ा सांगायचे म्हणजे अग्नीकुलने नव्यानेच श्रीहरीकोटा प्रक्षेपण केंद्रात आपले स्वतःचे प्रक्षेपणस्थळ विकसित करून मोठा टप्पा गाठला आहे. याचाच पुढचा भाग म्हणून बंगलुरु येथील बिलॅट्रिक या स्टार्टअप कंपनीने ‘इस्त्रो’च्या विविध योजनांतर्गत अंतराळात सोडण्यात आलेल्या प्रक्षेपणांचे योग्यपणे वाहतूक नियंत्रण होण्यासाठी नियोजन करते. लिओ सॅटेलाईटने प्रक्षेपणाचा परिणामकारक उपयोग होऊन त्याच्या उपयोगाला व्यापकता येण्यासाठी अद्ययावत व उपयुक्त अशी छायाचित्रण पद्धती विकसित
करते.
बदलते तंत्रज्ञान व संशोधनाचा फायदा ‘इस्त्रो’ ला व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने ‘इन स्पेस’ या मंचाची निर्मिती केली. त्यामुळे स्टार्टअप-संशोधकांसाठी अंतराळ-तंत्रज्ञान व अनुषंगिक क्षेत्रात मोठे दालन उपलब्ध झाले. गेली 5 वर्षे अंतराळ क्षेत्राशी निगडित स्टार्टअप कंपन्यांनी स्वतःला प्रस्थापित केले. याकामी त्यांचे संशोधनप्रचुर साहित्य मोठय़ा कामी आले. तंत्रज्ञानाचे अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱयांना व्यापक दृष्टिकोन व संशोधन-सृजनतेसह काम करण्यास मोठा वाव मिळाला. यातून त्यांना एक नवे व वेगळे व्यवसाय क्षेत्र लाभले. अंतराळातून वातावरणासह शेती पिकांचा अभ्यास, निगराणी व वेळेत मार्गदर्शन करण्यासाठी स्टार्टअप कंपन्यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे.
दत्तात्रय आंबुलकर








