सातारा :
सातारा शहरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, यामुळे होणाऱ्या नागरिकांना त्रासाची दखल थेट पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी घेतली. ‘तरुण भारत’ने अनेकवेळा शहरातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण याबाबत आवाज उठविला आहे. याचीच दखल घेऊन शहरातील मुख्य रस्ता आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या महत्वाच्या चौकात त्यांनी भेट देऊन वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांच्याशी उपाययोजनांची चर्चा करत शहरात सायंकाळी सहानंतर रात्री उशिरापर्यंत दुचाकीवरून फेरफटका मारला.
साताऱ्यात दुचाकीवरून शहरातील वाहतूक कोंडीचा निपटारा करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी दखल घेतल्याने नागरिकांकडून यावर प्रभावी उपाय योजना होणार अशी अपेक्षा होऊ लागली आहे.
सातारा शहरातील गोडोली नाका, साई मंदिर चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, पोवईनाका परिसर, मोती चौक, देवी चौक, राधिका चौक, राजवाडा परिसर, समर्थ मंदिर चौक, कमाने हौद चौक, पाचशे एक पाटी, मार्केट यार्ड, जिल्हा शासकीय रुग्णालय, एसटी स्टॅण्ड परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होते. शहरात कुठेही पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यालगत नागरिकांकडून वाहने लावली जातात. त्यातच वाहतूक शाखेची क्रेन नो पार्किंगमध्ये गाडी दिसली की, उचलली जाते. सातारकर दंडात्मक कारवाईची रक्कम भरून बेजार झाले आहेत. त्यातच वाहतूक कोंडीचा प्रश्न चांगला गंभीर झाला असून याची दखल पोलीस प्रशासन आणि नगरपालिका यांनी घ्यावी याबाबत तरुण भारतकडून सातत्याने आवाज उठविला आहे.
अखेर पोलीस अधीक्षकांनी वाहतूक कोंडी या प्रश्नाची दखल घेऊन शहरात सर्व ठिकाणे दुचाकीवरून वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक यादव यांच्यासोबत फेरफटका मारला.
प्रत्येक ठिकाणी फेरफटका मारताना वाहतूक कोंडीसाठी उपाय योजना करता येतील. याबाबत चर्चा करत होते. त्यामुळे साताऱ्यात वाहतूक कोंडीतून सुटकारा होणार अशी सातारकरांची अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे.
- आज पाहणी, लवकरच उपाययोजना
गेल्या अनेक वर्षापासून सातारा शहरात वाहतूक कोंडीची समस्या आहे. यावर तोंडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा सुरू आहे. यामुळे कोंडी होणाऱ्या ठिकाणीची पाहणी दुचाकीवरून करत संपूर्ण सातारा शहराचा आढावा घेतला. लवकरच योग्य ती अंमलबजावणी करून नवीन उपाय योजना करणार आहे.
-तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा








