सूरतमध्ये सर्वात मोठ्या ऑफिस बिल्डिंगची निर्मिती : अमेरिकेच्या ‘पेंटॉगान’ला टाकले मागे : 5 हजार कोटी रुपयांचा निर्मितीसाठी खर्च
वृत्तसंस्था /सूरत
जगातील सर्वात मोठ्या ऑफिस बिल्डिंगचा मान आतापर्यंत अमेरिकेचा संरक्षण विभाग म्हणजेच पेंटागॉनकडे होता. परंतु आता भारतात जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग निर्माण करण्यात आली आहे. ही बिल्डिंग गुजरातच्या सूरतमध्ये उभी राहिली आहे. सूरत शहराला हीरेव्यापाराचे केंद्र मानले जाते. या इमारतीला देखील हीरे व्यापाराचे केंद्र म्हणून वापरले जाणार आहे. जागतिक हिरे व्यापारातील 90 टक्के उलाढाल सूरत शहरातूनच होत असते. हे पाहता सूरत डायमंड बोर्स हेच जागतिक हिरेव्यापाराचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.सूरत शहरातील या आकर्षक इमारतीचे नाव सूरत डायमंड बोर्स ठेवण्यात आले आहे. जगातील जेम कॅपिटलच्या स्वरुपात प्रसिद्ध सूरतच्या या इमारतीला ‘वन स्टॉप डेस्टिनेशन’च्या स्वरुपात निर्माण करण्यात आले आहे. ही इमारत एकूण 15 मजली असून ती 35 एकरमध्ये फैलावलेली आहे. या इमारतीत हिरेव्यापाराशी निगडित पॉलिशर्स, कटर्स आणि व्यापारी या सर्वांकरता सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या इमारतीला नऊ आयताकृती संरचनेच्या स्वरुपात निर्माण करण्यात आले असून या सर्व परस्परांशी सेंट्रल स्पाइनच्या स्वरुपात जोडलेल्या आहेत. या इमारतीमधील ऑफिस स्पेस 7.1 दशलक्ष चौरस फुटांपेक्षा अधिक असून याचे उद्घाटन नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. ही भव्य इमारत निर्माण करण्यास चार वर्षांचा कालावधी लागला आहे.
हिरेव्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचे केंद्र
या कॉम्पलेक्समध्ये एक एंटरटेनमेंट आणि पार्किंग एरिया असून तो 20 लाख चौरस फूटांमध्ये फैलावलेला आहे. एसबीडी डायमंड बोर्स ना नफा तत्वावर चालणारी संस्था असून ती कंपनी अधिनियम, 2013 मधील कलम 8 अंतर्गत नोंदणीकृत करण्यात आली आहे. नवी इमारत कॉम्पलेक्स हजारो हिरेव्यापाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांना उलाढाल वाढविण्यास मदत मिळण्यासह दैनंदिन प्रवासात सुलभता प्राप्त होणार असल्याचे या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश गढवी यांनी म्हटले आहे.
अनेक कंपन्यांचा सहभाग
सूरत डायमंड बोर्सला एका आंतरराष्ट्रीय स्तरीय स्पर्धेनंतर भारतीय कंपनी मॉर्फोजेनेसिनने डिझाइन केले आहे. अमेरिकेच्या पेंटागॉनला मागे टाकू अशी कल्पना आम्ही प्रारंभी केली नव्हती. आम्ही केवळ व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी ही इमारत निर्माण केली होती. हिरेव्यापाराच्या या केंद्रात अनेक कंपन्यांनी स्वत:साठी जागा खरेदी केल्याचे गढवी यांनी सांगितले आहे.
दीड लाख लोकांना रोजगार
35 एकर क्षेत्रात निर्माण या इमारतीत 15 मजले अन 9 बिल्डिंग कॉम्प्लेक्स आहेत. या इमारतीत एकूण 137 लिफ्टचा वापर करण्यात आला आहे. तसेच 300 चौरस फुटांपासून 75 हजार चौरस फुटांपर्यंत ऑफिस स्पेस उपलब्ध करण्यात आली आहे. या इमारतीत एकाचवेळी 67 हजार लोक बसून काम करू शकतील. या इमारतीमुळे प्रत्यक्ष स्वरुपात 1.5 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. इमारतीत कॉन्फरन्स हॉल, क्लब, बँक्वेट हॉल, हेल्थ क्लबपासून रेस्टॉरंट देखील आहे. 4 हजारांहून अधिक कॅमेरे बसविण्यात आले असून अत्याधुनिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
सूरत डायमंड बोर्स
- एकाचवेळी 65 हजारांहून हिरे कारागिर एकत्र काम करू शकणार
- 15 मजली भव्य इमारत एकूण 35 एकरमध्ये फैलावलेली
- 9 आयताकृती संचरनांची निर्मिती, सेंट्रल स्पाइनच्या स्वरुपात जोडलेल्या
- 7.1 दशलक्ष फुटांपेक्षा अधिक आहे इमारतीचा फ्लोअर स्पेस
- 4 वर्षांच्या कालावधीत इमारत पूर्ण, नोव्हेंबरमध्ये होणार उद्घाटन
- 4700 हून अधिक ऑफिसेस, इमारतीत एकूण 131 लिफ्ट
- 5 हजार कोटी रुपयांचा सूरत डायमंड बोर्सच्या निर्मितीसाठी खर्च
- 4200 हिरे व्यापाऱ्यांनी एकत्र येत केली इमारतीची निर्मिती
- कार स्कॅन करण्याची परिसराच्या प्रवेशद्वारांवर व्यवस्था









