जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडून सात जणांवर निलंबनाची कारवाई : आरोग्य खात्याच्या प्रतिमेला धक्का
बेळगाव : जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या इमारतीमध्ये मद्यपान करुन पार्टी करणाऱ्या ‘त्या’ सात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली असून पार्टी करणे आता अंगलट आले आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी निलंबनाचा आदेश बजावला आहे. निलंबन केलेल्यांमध्ये सहाय्यक अधिकारी महेश हिरेमठ, ग्रुप डी कर्मचारी महेश नाईक, हिरेबागेवाडी समुदाय आरोग्य केंद्राचा वाहन चालक यल्लाप्पा मरनिंगगोळ, वाहन चालक सत्याप्पा तम्मन्नावर, दीपक गावडे, मंजुनाथ पाटील यांच्यासह कंत्राटी कर्मचारी अनिल तिप्पण्णावर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
कार्यालयामध्ये पार्टी केल्याचा व्हिडीओ दि. 10 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे आरोग्य खात्यात खळबळ उडाली होती. याची गंभीर दखल घेत जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. जारी करण्यात आलेल्या नोटिसीला संबंधित पार्टी केलेल्या कर्मचाऱ्यांकडून उत्तर देण्यात आले होते. मात्र तपासातून सदर उत्तर समर्पक नसल्याचे दिसून आले आहे. यावरुन जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचा अहवाल पाठविला आहे. आरोग्य खात्याच्या प्रतिमेला धक्का बसल्याने जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. खातेनिहाय चौकशी बाकी ठेवून सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे.
मद्यपानापासून दूर रहा, आरोग्य सांभाळा, असा संदेश देणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनच कार्यालयात मद्यप्राशन करुन पार्टी केल्याने आरोग्य खात्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. व्हायलर झालेल्या व्हिडीओवरुन नागरिकांतून आरोग्य खात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावरुन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांना याची गंभीर दखल घेत निलंबनाचा आदेश जारी करणे भाग पडले आहे. यामुळे सरकारी कार्यालयात पार्टी व वाढदिवस साजरा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही चांगलीच चपराक आहे.









