ब्रह्माच्या गहनतेबद्दल सांगताना भगवंत म्हणाले, उद्धवा ब्रह्माचा ठावठिकाणा बुद्धीला लागत नाही, मन तर त्याची कल्पनाच करू शकत नाही कारण मनाला कोणत्याही गोष्टीची कल्पना येण्यासाठी प्रमाणाची गरज असते. अमुक अमुक, तमुक तमुक सारखे आहे असे मनात ठसले तर मन त्याची कल्पना करू शकते परंतु ब्रह्माची तुलना कशाशीच होत नसल्याने ब्रह्म ही संकल्पना मनाच्या कक्षेच्या बाहेरची असते.
आता कदाचित तुझ्या मनात असे येईल की, जे बुद्धीला समजण्यापलीकडे आहे, ज्याची मन कल्पना करू शकत नाही, जे शब्दज्ञानाच्या पलीकडचे आहे असे भगवंत ब्रह्माबद्दल बोलत आहेत. असेच जर ब्रह्माचे वर्णन असेल तर मुळातच ब्रह्म नावाची वस्तू अस्तित्वात तरी असेल का? असं जर तुला वाटलं तर त्यात गैर असे काहीच नाही कारण ज्या वस्तूचा ठावठिकाणा कोणत्याच मार्गाने लागत नसेल ती वस्तू अस्तित्वात आहे की नाही अशी शंका येणे रास्तच आहे. ह्या तुझ्या शंकेचे निरसनही मी करीन. असे म्हणून भगवंतानी आत्म्याबद्दलच्या निरुपणास सुरवात केली. ते म्हणाले, ब्रह्माचा अंश म्हणून आत्मा देहात उपस्थित असतो. शरीराच्या सर्व हालचालीना आवश्यक ती ऊर्जा पुरवतो. ह्या उर्जेच्या जोरावर शरीराच्या सर्व हालचाली होत असतात. त्यामुळे ब्रह्म किंवा त्याचा शरीरात असलेला अंश दिसत नसला तरी अस्तित्वात असतो हे नक्की. आणखी एक सांगायचं म्हणजे आत्मा शरीराला ऊर्जा पुरवत असला तरी शरीराच्या कोणत्याही हालचालीना किंवा ते करत असलेल्या कर्माला जबाबदार नसतो. माणसाचा देह, इंद्रिये आणि प्राण हे सर्व जड, मूढ आणि म्हणूनच अचेतन आहे. तू म्हणशील की, मला तर हे सर्व हलताना दिसत आहे ते कसं? तर ह्यासर्वांना सदैव अमर असलेला आत्मा चैतन्य पुरवत असतो. त्याबद्दलही नीट ऐक. ज्याप्रमाणे चुलीतून उष्णतारुपी शक्ती मिळते परंतु त्या उष्णतेचा वापर करून माणूस काय शिजवतोय ह्याच्याशी त्या चुलीचा काहीही संबंध नसतो. त्याप्रमाणे आत्म्याच्या प्रभेने दृष्टीला चैतन्य मिळते पण आत्म्याला दृष्टी जे काही पहात आहे त्याच्याशी काहीही घेणेदेणे नसते. आत्मसत्तेमुळे कान ऐकू शकतात पण ते काय ऐकतायत हे आत्मा ऐकत नाही. आत्मसत्तेमुळे माणसाला बोलण्याचे बळ मिळते परंतु काय बोलायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य माणसाला असते. आत्मा त्यात लक्ष घालत नाही किंवा तो काय बोलतोय ह्याला आत्मा जबाबदार नसतो. तसेच आत्म्याने मनाला वेढलेले असते परंतु मनावर आत्म्याची कोणतीही सत्ता नसते. चित्तालाही आत्माच बळ पुरवत असतो. त्यामुळे चित्त अंर्तबाह्य चैतन्यपूर्ण असते परंतु चित्तालाही चैतन्य काय आहे हे समजू शकत नाही. आत्म्याचा संयोग झाल्याने माणसाचा अहंकार चेतवला जातो. अहंकाराला आत्म्याने जरी वेढलेले असले तरी आत्म्याला कधी अहंकाराची बाधा होत नाही. आत्म्याच्या प्रभावाने बुद्धीचा प्रकाश पडतो त्यातूनच विवेकबुद्धीही प्रकाशित होते. आत्मप्रभेने ‘प्राण’ कार्यरत होतो पण प्राणाला आत्म्याचा स्पर्शही होत नाही. त्यामुळे प्राणाला परमात्मा कळत नाही. उद्धवा तू हे लक्षात घे की, हे जे सगळं हलताना, फिरताना दिसतंय ते मुळात जड किंवा अचेतन आहे. त्यामुळे त्याच्यात स्वत:हून काहीही करायची ताकद नसते. ह्याउलट आत्मा मात्र कायमचा स्वत: सिद्ध असतो आणि कोणत्याही परिस्थितीत ह्यात बदल होत नाही. तो निरनिराळे भेद दाखवतो पण स्वत: अभेद असतो. निरनिराळी द्वंद्वे प्रकाशित करतो पण स्वत: निर्द्वन्द्व असतो. ही गोष्ट उद्धवाच्या मनावर भगवंतानी ठसवली. आत्मा स्वत: परिपूर्ण असून तो संसारास कारणीभूत आहे असे त्याच्यावर होणारे आरोप भगवंतांनी खोडून काढले आणि त्याचबरोबर आत्मा जरी दिसत नसला तरी तो आहे हे खरे कशावरून? ह्या उद्धवाच्या शंकेचे समर्पक उत्तर देऊन आत्मा दिसत नसला तरी त्याचे अस्तित्व कसे अनुभवता येते हे उदाहरणासहित दाखवून दिले.








