अध्याय अठ्ठाविसावा
देहाभिमानापोटी माणसाला कित्येक दु:खे कशी भोगायला लागतात ते भगवंत उद्धवाला सांगत आहेत. ते म्हणाले, सर्वप्रथम देहाभिमान अद्वैताची वाढ करतो. त्यामुळे मनुष्य स्वत:ला देवापेक्षा श्रेष्ठ समजू लागतो. त्यातूनच त्याला जगातल्या वस्तूबद्दल आवडनिवड निर्माण होते. त्यातून नश्वर असलेल्या इष्ट वस्तूचा नाश झाला की, त्याला देहाच्या अहंतेमुळे दु:ख होते. तसंच नाश पावणाऱ्या विषयांची प्राप्ती झाली की, त्याला आनंद होतो. आपल्याला मिळालेले विषय आपल्याला सोडून तर जाणार नाहीत ना, या विचाराने त्याचे चित्त कासावीस होते. ज्या कुणामुळे त्याच्या विषयसेवनामध्ये अडथळा निर्माण होतो त्या व्यक्तीचा त्याला राग येतो. एक एक पैसा जमवून मनुष्य पैसे साठवतो. ह्याला लोभ असे म्हणतात. असे करत करत एक दिवस त्याचे आयुष्य संपून जाते. कर्माकर्म, हिताहित, इष्टानिष्ट कशाकशाची पर्वा न करता विवेकशून्यपणे आयुष्य संपते, त्याला मोह असे म्हणतात. जो नित्य विषयसेवन करत असतो त्याच्या मनात विषयसेवनाची इच्छा आणखीन आणखीन वाढतच जाते. त्यामुळे त्याला अखंड विषयांचेच ध्यान लागलेले असते. त्यालाच स्पृहा असे म्हणतात. असे हे नाना गुण माणसाच्या ठिकाणी देहाभिमानामुळे येऊन चिकटतात. माणसाच्या जन्ममरणाला कारणीभूत होणाऱ्या ह्या गुणांचा आत्म्याशी काही संबंध नसतो. आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जेथे मी कर्ता आहे असा देहाभिमान नसतो. म्हणजे स्वभाव निराभिमानी असतो तेथे जन्ममरणाला कारणीभूत होणारे हे गुण उपस्थित नसतात. वाऱ्यामुळे पाण्यावर तरंग उमटतात. त्याप्रमाणे वर सांगितलेले शोक, हर्ष इत्यादि विकार अहंतेमुळे जीवाला त्रास देत असतात. जीवाला जडलेल्या ह्या अहंतेचा जर त्याग घडला तर तर त्याला मुक्ती मिळते. मग तू विचारशील की अहंकारालाच बांधून ठेवता आलं तर जीव आपोआपच मुक्त होईल ना? हे तुझं विचारणं कल्पना म्हणून ठीक आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की, अहंकाराला मुक्ती कल्पांती शक्य नाही. ह्याचं कारण विचारशील तर असं सांगता येईल की, अनंत, अपार, ज्ञानघन असलेला आत्मा जरी पूर्णपणे मायेच्या पलीकडे असला तरी तोच मायेचा आधार आहे. ह्या मायेचा आधार असलेल्या आणि तिचे नियंत्रण करणाऱ्या परमेश्वराला मायेचा नियंता असे म्हणतात. ही माया त्रिगुणांनी युक्त असल्याने, ह्या मायेमुळेच अहंता निर्माण होते. जेव्हा तो शरीरात आत्म्याच्या रूपाने प्रवेश करतो तेव्हा तो अविद्येने वेढला जातो. म्हणून त्याला जीवात्मा असे म्हणतात. शरीरात प्रवेश केल्यावर आत्मा आपण ईश्वरी अंश आहे हे विसरतो. ह्यामुळे त्याला शरीर हेच माझे अस्तित्व आहे असे वाटू लागते. आपला देह कायम सुखात राह्यला पाहिजे असे वाटून त्याला देहाच्या सुखाचा ध्यास लागतो. त्यासाठी मन, इंद्रिये, देहाचा आकार, त्रिगुण, पंचविषय, स्वधर्म महतत्त्व सर्वकाही तोच बनतो. मनाच्या रूपाने तो निरनिराळे संकल्पविकल्प करून देहाला सुख मिळवून द्यायची जबाबदारी आपलीच आहे असे समजतो. पापपुण्याचा मानीव चमत्कार आणि त्याचा उपभोग घेण्यासाठी देहाचा आकार तोच होतो. तो देह तयार होण्यासाठी सत्व-रज, तम हे तीन्ही गुण तोच होतो. त्या गुणांचा क्षोभ होण्याचे कारण असलेले पंचविषय तोच होतो. विषयभोगांचे क्रिया कर्म करण्यासाठी तो स्वधर्म होतो. तिनी गुणांचे जन्मकारण असलेले महतत्त्व-ही तोच झाल्याने सर्व संसार हा ईश्वर स्वत:च होतो असे म्हंटलेस तरी चालेल. ह्या गुणांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती हीही तो स्वत:च होतो. त्यातूनच उत्पत्ती, स्थिती, प्रलय हेही तोच घडवून आणतो म्हणून काळ हे त्याचेच रूप होय. काळाच्या अंगात अफाट शक्ती असते. त्या शक्तीच्या आधारे तो निर्मिती, पालन आणि संहार करत असतो. अशा पुन:पुन्हा त्याने किती आवृत्ती काढल्या असतील हे त्याचे त्यालाच माहित. ब्रह्माला झालेल्या अहं ब्रह्मास्मि ह्या स्फूर्तीतून संसार ईश्वराच्या लीलेमुळे साकार झाला. असं जरी असलं तरी विश्वेश्वर, विश्वमूर्ती असा तो एकटाच आहे.
क्रमश:








