एखाद्याचं व्यक्तिमत्त्व आदरणीय असतं. त्यांच्यापुढे गेल्यावर चटकन नतमस्तक व्हावं असंच वाटतं. पण एखाद्याचं व्यक्तिमत्त्व मात्र असं असतं की जणु आपली सावली होऊन तो चालतोय. कृष्णाला मी सोलमेट म्हणते ते याचसाठी.
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती धरोनिया
चालो वाटे आम्ही तुझाचि आधार
चालविसी भार सवे माझा.
असं सहज तुकोबा म्हणतात ते तेवढा विश्वास असल्याशिवाय का? कृष्ण कृष्ण म्हणतात तो मोठा खेळिया आहे. त्याचं रूप शोधू जाल तर सापडत नाही आणि काढू जाल तर स्वत:तून वेगळं काढता येत नाही. त्याच्या प्रीतीत वेडी झालेल्या एकाही स्त्राrचा तो पूर्णांशाने झाला नाही. पण त्याचं बोलणं मात्र गारुड करणारं. प्रत्येकीशी तो असं काही गोड बोलेल की तिला वाटावं नाही नाही तो माझाच आहे. फक्त माझाच! पण एकदा का तिला त्याच्या सहवासाची झिंग चढली रे चढली की तिला अलगद उचलून त्या प्रीतीच्या धुंदीत सुरक्षित सोडून तो दुसरीच्या हाकेला ओ द्यायला चाललाच म्हणायचा! त्याच्या हयातीतच त्याच्या प्रियसख्यांची संख्या सोळा हजार ओलांडून पुढे गेलेली होती. पण प्रेम कसं करावं, प्रियाराधन किती गोड असावं याचं कृष्णाइतकं सुरेख उदाहरण नसेल.
त्या चित्तचोरट्याला का आपुले म्हणू मी?
स्मृतिजाल आसवांचे दिनरात का विणू मी?
अस्सं म्हणायची वेळ यावी इतकं त्याचं वागणं! माणिक वर्मांचं हे गाणं ऐकावं. त्याची वृत्ती कशी मोहिनी असते ते कळून चुकतंच. उगीच नाही त्याच्या एका रूपाला मोहिनीराज म्हणून ओळखतात! अमृतमंथनाच्या वेळी असुरांना मोहात पाडण्यासाठी त्याने अतिशय देखण्या स्त्राrचं रूप घेऊन कुंभातलं अमृत देवांनाच कसं मिळेल याची सोय बरोबर केली होती. स्त्राrकायाप्रवेश केल्यामुळेच की काय, पण एखाद्या स्त्राrला आपल्या प्रियकराकडून काय हवं असतं ते त्याला छान उमगलेलं असतं.
तो शरीराने निघून गेला पण त्याचं हृदय आजही जिवंत आहे आणि पुरीच्या जगन्नाथाच्या मूर्तीत ते प्रविष्ट आहे असं म्हणतात. याच हृदयात ती चिरमोहिनी अजूनही आहे. त्यामुळे त्याच्या हयातीनंतरही त्याच्या प्रेमात पडणाऱ्यांची कमी नव्हतीच कधी. आणि आजही नाही.
इक राधा इक मीरा दोनोंने श्याम को चाहा
अन्तर क्या दोनोंकी चाह में बोलो
इक प्रेम दीवानी इक दरस दीवानी
कृष्णावतार होऊन गेल्यावर कितीतरी वर्षांनी ही चितौडकी छोरी जन्माला आली आणि अगदी राधेसारखीच त्याच्या प्रेमात पडली. त्याच्या एका दर्शनासाठी ती तिळ तिळ जाळत राहिली स्वत:ला. मीरेचं प्रेम विरहाचं, तिची भक्ती ही मधुराभक्ती. ही भक्ती हुबेहूब दाखवणारं एक अतिशय सुंदर गीत रवींद्र जैन यांनी रचलेलं आहे.
श्याम तेरी बन्सी पुकारे राधा नाम
लोग करे मीरा को यूँही बदनाम
सचिन, सारिका, पद्मा खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत राधा आणि मीरा यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेला फरक असा काही समोर आणतं! एका बैठकीत, डोळ्यातून अश्रु येऊ न देता हे गीत ऐकणंही मुश्किल आहे.
कौन जाने बासुरियाँ किसको बुलाये
जिसके मन भाए वह उसीके गुन गाये
कौन नहीं बासुरी की धुन का गुलाम?
हे कारण देऊन तो असंही म्हणतो,
सावरे की बन्सी को बजने से काम
राधा का भी श्याम वह तो मीरा का भी श्याम
ही कसली बाई रीत? म्हणजे तुला बासरीचे सूर आवडले तर तू येणारच ना? माझी बासरी सर्वांनाच प्रिय आहे! बासरीचे सूर पसरवीत राहणे हे माझं काम! म्हणून मी तिचाही आहे आणि तुझाही. झालं? समजूत घालणारं मिश्किल हसू गालांवर खेळवत तो पुढे होतो. अडकत म्हणून नाही कशात. कमलपत्रावर असणाऱ्या दवबिंदूसारखा सुळ्ळकन निसटून जातो त्याच्या प्रेमिकांच्या महासागरात! मीरेला मात्र काही फरक पडत नाही. ती ‘दर्शनमात्रे मनकामना पुरती’ असं म्हणून एकतारी घेऊन त्याचं नाव गात राहते.
बरसे बदरिया सावन की
सावन की मनभावन की
सावन में उमंग्यो मेरो मनवा
भणक सुण्या हरि आवन की
कुण्याकाळच्या या सावळ्याच्या नादानं मेवाडच्या रस्तोरस्ती तिला
मीरा के प्रभु गिरिधर नागर
म्हणत म्हणत नाचवलं होतं. तिची लाज, अब्रू,बाईपण, कशाकशाचा म्हणून मुलाहिजा न ठेवता! पण त्याच नादात ती त्याच्याशी अशी काही एकरूप होऊन गेली की मधुराभक्ती असावी ती मीरेसारखी असं आजही म्हणतात.
मीरेला वेड लावून त्याचं भागलं नसावं म्हणून त्याने आणखी एकीला खुळी करून सोडलं. दक्षिणेची मीरा म्हणून ओळखली जाणारी आळवार संतपरंपरेतली एक साध्वी गोदै किंवा कोदै अशीच त्याच्या नादी लागली आणि रंगनायकी होऊन गेली. तिनं कृष्णाला मनोमन आपला पति मानलं होतं. इतकं की कृष्णासाठी गुंफलेला हार ती रोज आधी आपल्या गळ्यात घालून आरशात पहायची आणि मगच कृष्णाला वहायची. एक दिवस हारात केस आलेला पुजाऱ्यांना कळलं आणि मग हलकल्लोळ उडाला. तो हार बदलला गेला. गोदै रड रड रडली. कृष्ण त्यादिवशी पुजाऱ्यांच्या स्वप्नात येते झाले आणि म्हणाले की आजची पूजा मला पावली नाही. मला तिच्याच गळ्यातला हार हवाय. बस्स. भोळी भाबडी गोदै त्याच गोष्टीने इतकी आनंदली! पुढे तिचं कावेरीच्या तीरावरल्या रंगनाथाशी विधिवत लग्न लावून देण्यात आलं. पण हे महाराज काही शिलेतून बाहेर नाही हं आले! तीच शिलामय होऊन गेली. गोड बोलून आपल्याला हवं तेच प्रियेकडून करून घ्यायची त्याची ही रीत अशीच आहे. कावेरीकाठच्या त्या रंगनाथाच्या देवळात जाणाऱ्या कुमारिका पाहिल्या की भीती वाटते. अनादिकाळापासून अनंगरंग खेळणारा तो रंगनाथ पुन्हा कुण्या एकीला वेड लावेल की काय?
अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु









