काही सामन्यांच्या विजयाचं मूल्यमापन करायचं नसतं. नेमका असाच सामना कालचा होता. भारत-पाकिस्तानएवढीच बांगलादेशविऊद्धची लढत मी महत्त्वपूर्ण मानतो. कारण त्यांनी दिलेली जखम भरून तर निश्चित आली आहे, परंतु व्रण मात्र कायम राहिले. ज्या ज्या वेळी बांगलादेशविऊद्ध सामना असतो त्या त्या वेळी ते व्रण मात्र मला खुणावत असतात. भारतीय संघाने एकदाच बांगलादेशला हलक्यात घेतलं होतं. (2007 मधील विश्वचषक स्पर्धा) परंतु त्यानंतर ‘हलक्यात घेण’ हा वाक्प्रचार विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या शब्दकोशातून काढून टाकला. किंबहुना क्रिकेटमध्ये नवखा, दुबळे हे विशेषण इतिहासजमा झालेत. चालू विश्वचषक स्पर्धेत नेमका कुठला देश बिगबॉस ठरणार आहे याचे उत्तर आपल्याला 29 तारखेला निश्चित मिळणार आहे. या शर्यतीत आफ्रिका, ऑस्ट्रेलिया निश्चितच आहेत. परंतु आम्हीही मागे नाही आहोत हे काल भारताने दाखवून दिले
कभी कभी कुछ दाग अच्छे होते है, या उक्तीप्रमाणे कालची नाणेफेक आपल्या विऊद्ध गेली हे बरं झालं. कालच्या सामन्यात प्रत्येक फलंदाज हिरोच्याच भूमिकेत दिसत होता. कुठलाच फलंदाज साईड हिरोच्या भूमिकेत इच्छुक नव्हता. किंबहुना भारताच्या पहिल्या 20 षटकांची क्रिप्ट ही फक्त फलंदाजांचीच होती. बरं, ही क्रिप्ट वाचताना कुठलाच भारतीय खेळाडू अडखळला नाही. कधी कधी काही कर्मचाऱ्यांना नोकरी करताना कंपनीमार्फत टार्गेट दिले जाते. अगदी तसंच टार्गेट भारतीय फलंदाजांना द्रविड गुऊजींनी दिलं असावं. विराट कोहलीपासून ते हार्दिक पंड्यापर्यंत सर्वांनी ते टास्क अगदी सहज पूर्ण केले. क्रिकेट हा खेळ कुणालाही जास्त दिवस नैराश्याच्या गर्तेत ठेवत नाही. आयपीएलमधील खराब कामगिरीनंतर हार्दिक संघात कसा, असा प्रश्न 99 टक्के क्रिकेट विश्लेषकांनी केला होता. (त्यात मीही होतो) परंतु मागील दोन ते तीन सामन्यात हार्दिक पंड्याने भल्या भल्या क्रिकेट विश्लेषकांना तोंडावर आपटलंय. काल परवापर्यंत हार्दिकला बसवा रे, असं म्हणणाऱ्यांना हार्दिकच्या चेंडूने आणि बॅटने अगदी कडक उत्तर दिले. क्रिकेटमध्ये जो दिवस तुमचा असतो त्या दिवशी तुम्ही त्याला दोन्ही हातानी लपेटलं पाहिजे. काल भारतीय संघाने नेमकं तेच केलं. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशी गोलंदाजांचे विशेषत: स्पिनर्सना अक्षरश: ओरबडून काढलं. ज्या स्पिनर्सच्या जीवावर बांगलादेश थोडाफार आशावादी होता, त्याच स्पिनर्सना भारतीय फलंदाजांनी अडगळीत टाकलं.
आयुष्यात म्हणा किंवा खेळात म्हणा, काही दु:खं ही आपल्या सोबत ठेवायची असतात. त्या दु:खात दुसरा तिसरा कोणीच वाटेकरी नसतो. असंच दु:ख अफगाणिस्तानच्या संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अनुभवलं होतं. ग्लेन मॅक्सवेलची अद्भुत खेळी त्याला कारणीभूत ठरली होती. त्याने भली मोठी जखम तर केलीच होती परंतु अफगाणिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी त्यावर मणभर मीठ ओतले होते. काल त्या जखमेवर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी मलम लावलं. खऱ्या अर्थाने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी खेळपट्टीला वश केलं होतं. राजकारणात म्हणा किंवा खेळात म्हणा, काही पराभव हे प्रचंड जिव्हारी लागलेले असतात. परंतु ज्यावेळी त्याचा वचपा काढला जातो त्यानंतर जो मिळणारा आनंद असतो, तो आनंद कुठल्याही एककात मोजला जात नाही. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने त्यांच्या तोंडातला घास काढला होता. आज अफगाणिस्तानने त्यांच्या ताटातलाच घास हिरावून घेतला. काल परत एकदा ग्लेन मॅक्सवेल त्यांच्या भळभळत्या जखमेवर टोच मारतो की काय, असं वाटत असतानाच मॅक्सवेलला बाद करण्यात त्यांना यश आलं. सात महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला हरवत उपांत्य फेरीची त्यांचे दरवाजे बंद केले होते. कालच्या ऑस्ट्रेलियाच्या पराभवाने मात्र उपांत्य फेरीचा अर्धा दरवाजा का होईना बंद झालाय एवढं मात्र खरं. आणि तो दरवाजा जर पूर्णत: बंद करायचा असेल तर मात्र आज ऑस्ट्रेलियाविऊद्ध होणारा सामना भारताला जिंकावाच लागेल.
असो. दहा वर्षात क्रिकेटच्या कुठल्याही फॉरमॅटमध्ये एवढी गुंतागुंत मी कधीच पाहिली नव्हती जेवढी या विश्वचषक स्पर्धेत बघायला मिळते. प्रत्येक संघाला क्रिकेट इथे आशा दाखवते. कधी इंग्लंड, तर कधी विंडीज आणि आता अफगाणिस्तान. युद्धात नेहमी म्हटले जाते ‘जो जीता वही सिकंदर’. बघायचंय, या चालू विश्वचषक स्पर्धेत कुठला संघ मुकद्दर का सिकंदर बनतोय याचे उत्तर मात्र येणारा काळच देईल !









