घटनेनंतर आरोप-प्रत्यारोपांच्या ‘फैरी’
चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाबचे वरि÷ आयएएस अधिकारी संजय पोपली यांचा मुलगा कार्तिक पोपली (26) याचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. घटनेच्या वेळी दक्षता पथक तपासासाठी पोपलीच्या चंदिगढ येथील घरी पोहोचले होते. दक्षता पथकाने कार्तिकवर गोळीबार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्याचवेळी कार्तिकने स्वतःकडील परवाना असलेल्या पिस्तुलने गोळी झाडल्याचा दावा चंदिगढचे एसएसपी कुलदीप चहल यांनी केला आहे. एकंदर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्यानंतर प्रकरण वाढल्याचे दिसून येत आहे.
भ्रष्टाचारप्रकरणी दक्षता विभागाने संजय पोपली यांना चार दिवसांपूर्वी चंदिगढ येथून अटक केली होती. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू होती. त्यांना शनिवारी मोहाली न्यायालयात हजर केले जाणार होते. याचदरम्यान त्यांचा मानसिक छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. खोटे वक्तव्य देण्यासाठी दक्षता विभाग त्यांच्यावर दबाव आणत असल्याचे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे. याच प्रकरणाच्या अधिक तपासासाठी शनिवारी दक्षता विभागाचे अधिकारी शनिवारी त्यांच्या घरी आले होते. यादरम्यान त्यांचा मुलगा कार्तिक आणि दक्षता अधिकाऱयांमध्ये वादावादीचा प्रकार घडल्याचे समजते. त्यानंतर झालेल्या गोळीबारात कार्तिकचा मृत्यू झाला. दक्षता विभागाच्या अधिकाऱयांनीच कार्तिकचा जीव घेतल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर आईने आपल्या मुलाच्या मृत्यूला तपास यंत्रणाच जबाबदार असल्याचे सांगितले.
पोपलींच्या घरातून काडतुसे जप्त
संजय पोपली याच्या अटकेनंतर दक्षता विभागाने त्याच्या चंदिगढ येथील सेक्टर 11 येथील घराची झडती घेतली असता तेथे 73 काडतुसे सापडली होती. यामध्ये 7.65 एमएमची 41, .32 बोअरची 2 आणि .22 बोअरची 30 काडतुसे समाविष्ट आहेत. या जप्तीनंतर पोपली यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आयएएस अधिकारी संजय पोपली यांची पंजाब सरकारमध्ये पेन्शन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी दक्षता विभागाने त्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती.









