पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांमध्ये भीती, तातडीने पाहणी करून संरक्षक भिंतीची उभारणी करा
बेळगाव : राजहंसगडावर जाण्यासाठी रस्ता करण्यात आला. हा रस्ता करताना कड्याची खोदाई करण्यात आली आहे. मात्र आता त्या कड्याची माती कोसळत असून भूस्खलनाची भीती व्यक्त होत आहे. जवळपास तीन ते चार ट्रॅक्टर भरेल इतकी माती या पावसामुळे कोसळली असून वेळीच त्याला संरक्षक भिंत घालावी, अशी मागणी पर्यटकांबरोबरच येथील नागरिक करत आहेत. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीतीही जाणकारातून व्यक्त करण्यात येत आहे.
यावर्षी दमदार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे यापूर्वी खोदाई करण्यात आलेल्या कड्याची माती कोसळताना दिसत आहे. पाऊस आल्यानंतर कड्याची माती खाली कोसळत बाजूला रस्ता आहे. याचबरोबर याठिकाणी बसण्यासाठी जागा तसेच हॉटेलही आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात माती कोसळली तर मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तेव्हा तातडीने पर्यटन विभागाबरोबरच लोकप्रतिनिधींनीही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
राजहंसगडाचा विकास साधण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राजहंसगडावर जाण्यासाठी रस्ता करण्यात आला होता. हा रस्ता करताना मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली. त्यामुळे कड्याला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीच मोठ्या संरक्षक भिंत बांधणे गरजेचे होते. पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तो कडा कोसळणार नाही असे सांगण्यात येत आहे. मात्र सध्या झालेल्या जोरदार पावसामुळे बरीच माती कोसळली आहे. तेव्हा तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.









