वाघवडेजवळील कारखान्यात चोरी, गुड्स रिक्षाही जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
वाघवडेजवळील एका कारखान्यातून तांबे चोरल्याच्या आरोपावरून पाच जणांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 90 बंडल वायर व चोरीसाठी वापरण्यात आलेली गुड्स रिक्षा असे एकूण 10 लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
रमेश ऊर्फ रामू नागप्पा धुळाप्पगोळ (वय 22) राहणार मार्कंडेयनगर, संतोष ऊर्फ बल्ल्या गणेश नायक (वय 23) राहणार नावगे क्रॉस, लगमप्पा बसाप्पा यरगानी (वय 25) राहणार मार्कंडेयनगर, सोमय्या अडवय्या हिरेमठ (वय 23) राहणार नावगे क्रॉस, प्रज्वल विरुपाक्षी कंबी (वय 21) राहणार नावगे क्रॉस अशी त्यांची नावे आहेत.
बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. 8 जून रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकली व गुड्स वाहनातून वाघवडेजवळील गोकुल मेटाटेक प्रा. लि. या कारखान्याच्या स्टोअरचा कडीकोयंडा तोडून तांब्याची वायर पळविण्यात आली होती.
चोरलेली वायर विकण्यासाठी कोल्हापूरला जाताना या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून जीएम कंपनीचे 75 बंडल व फिनोलेक्स कंपनीचे 15 बंडल वायर, चोरीसाठी वापरण्यात आलेली गुड्स रिक्षा असा एकूण 11 लाख 91 हजार 660 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या बेळगाव ग्रामीण पोलिसांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.









