प्रतिनिधी/ बेळगाव
मच्छे येथे गांजा विकणाऱ्या दोघा जणांना सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 1 किलो 366 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अतिफ अन्सारी मुल्ला, राहणार जांबोटी रोड, मच्छे, सैफअली आयुबहुसेन माडीवाले, राहणार पाटील गल्ली, पिरनवाडी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी साई कॉलनी, मच्छे परिसरात या दोघा जणांना अटक केली आहे.
हुंचेनहट्टी येथील आकाश दोडमनी याच्याकडून हा साठा आपण आणल्याची कबुलीही या दोघा जणांनी दिली आहे. त्यांच्याजवळून 40 हजार रुपये किमतीचा 1 किलो 366 ग्रॅम गांजा, एक हजार रुपये रोख रक्कम, 20 हजार रुपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल, 53 हजार रुपये किमतीचा आयफोन, गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली केए 22 ईक्स 4698 क्रमांकाची सुझुकी मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 20(बी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









