बेळगाव : बेळगाव, खानापूर, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देत म. ए. समितीच्या नगरसेवकांनी महापौर-उपमहापौर निवडणुकीवेळी महापालिका कार्यालयात प्रवेश केला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन करून महापालिकेकडे रवाना झाले. महापालिका आवारात प्रवेश करताच घोषणा देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सप्टेंबर 2021 मध्ये महापालिका निवडणूक झाली. त्यावेळी राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हांवर झालेल्या निवडणुकीमुळे आणि निवडणूक मतदान यंत्रातील घोळामुळे निवडणुकीत मराठी भाषिक उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत केवळ चार जागांवर म. ए. समितीचे नगरसेवक निवडून आले आहेत. एकेकाळी महापालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता कायम होती. नगरसभेपासून मागील सभागृहातदेखील मराठी भाषिक आणि म. ए. समितीची सत्ता होती. त्यामुळे मराठी भाषिकांची मानबिंदू म्हणून महापालिकेकडे पाहिले जाते. मात्र 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हांवर झालेल्या निवडणुकीमुळे मराठी भाषिकांना पराभव पत्करावा लागला. मराठी भाषिकांनी 40 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र मतदान यंत्रातील घोळ आणि विविध आमिषांना बळी पडलेल्या मतदारांमुळे मराठी भाषिकांना केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले. मात्र राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये 22 नगरसेवक हे मराठी भाषिक आहेत. राष्ट्रीय पक्षाच्या नादाला लागून मराठी भाषिकांनी मराठी भाषिकांचाच घात केल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. निवडून आलेल्या म. ए. समितीच्या चार नगरसेवकांनी प्रामाणिकपणे कार्यरत राहून म. ए. समितीचा आवाज महापालिका सभागृहात पोहोचविण्याचा प्रयत्न सोमवारी केला. भगवे फेटे परिधान करून नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी महापालिका आवारात प्रवेश करताच बेळगाव, खानापूर, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. एकेकाळी 40 नगरसेवकांच्या एकीतून घुमणारा आवाज केवळ 3 नगरसेवकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा नारा महापालिकेत घुमविला. यावेळी मराठी बाणा आणि मराठी भाषिकांचे अस्तित्व आजही महापालिकेत आहे, याची जाणीव प्रशासनाला करून दिली.









