पुणे / प्रतिनिधी :
लम्पी आजाराबाबत आम्ही उपाययोजना सुरू केली आहे. राज्यात 2 कोटी पशूधन आहे. त्यापैकी 4 हजार पशूधनाला आजार झाला आहे. योग्यवेळी उपाययोजना केल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे. इतर राज्याच्या तुलनेत आपल्याकडे या आजाराची लागण अधिक नाही. मी स्वत: जिल्ह्यांना भेटी देऊन पाहणी करत आहे. तसेच संपूर्ण राज्यात पशुधनाचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil ) शुक्रवारी येथे स्पष्ट केले.
पशुसंवर्धन आयुक्तालय येथे राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विखे पाटील म्हणाले, काल एका दिवसात एक लाख लसीकरण करण्यात आले आहे. 75 लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण होणार आहे. याचा 100 टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे. तसेच जिल्हा पातळीवर हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असून, तसे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अधिक वाचा : पुण्यातील ‘सेक्स तंत्र’ शिबीर अखेर रद्द
दुधाची कृत्रिम टंचाई केल्यास कारवाईचा इशारा
राज्यात कोठेही दुधाचा तुटवडा नाही. जर कोणी दुधाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर कारवाई केली जाईल. लम्पी आजाराबाबत अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. एकूण 25 लाख लस उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावे
फॉक्सकॉन वेदांता बाहेर गेला, याला महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे. त्यांनी योग्य पाठपुरावा केला नाही. तिघांचे आघाडी सरकार होते. त्यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला नाही. तरीदेखील आता आमचे सरकार मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. आमच्या सरकारवर टीका करण्यापूर्वी शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावे. त्यांनी राज्यात कोणते प्रकल्प आणले? जनहिताची कोणती कामे केली, असा सवालही विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.