अर्धवट कामांमुळे वाहतूक कोंडीत भर : काँक्रिटीकरणामुळे बंद होता सिग्नल
बेळगाव : आरपीडी चौक परिसरात मागील काही महिन्यांपासून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे येथील सिग्नल बंद करण्यात आला होता. तब्बल तीन महिन्यांनी पुन्हा एकदा सिग्नल सुरू करण्यात आला आहे. परंतु, अद्याप एका बाजूचे काँक्रिटीकरण अपूर्ण असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरातील एक महत्त्वाचा चौक असणारा आरपीडी चौक येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. शाळा, महाविद्यालये, आस्थापने व बाजारपेठ असल्यामुळे वाहनांची रहदारी असते. मागील काही महिन्यांपासून गोवावेस येथील बसवेश्वर सर्कलपासून अनगोळ नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले. यामुळे काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती. एका बाजूचा रस्ता पूर्ण झाला असून दुसऱ्या बाजूचे काम अर्धवट स्थितीत आहे. वाहतुकीची कोंडी होत असल्याने सोमवारपासून सिग्नल सुरू करण्यात आला. सकाळी व सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे सिग्नल सुरू करण्यात आला. परंतु, यामुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखीच भर पडत आहे. रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे वाहने लवकर पुढे सरकत नाहीत. दुसरा सिग्नल संपेपर्यंत वाट पहावी लागत असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे.









