डॉल्बीला फाटा : लेझीम खेळाला प्राधान्य : तरुण-तरुणींचा मोठा सहभाग
वार्ताहर /किणये
हलगा येथील शिवनेरी चौक, मरगाई गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझीम पथकाच्या तरुण व तरुणींनी उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मंडळाने डॉल्बीला फाटा देऊन लेझीम खेळाला प्राधान्य दिले आहे. मिरवणुकीत तरुण-तरुणी व बालचमुंचा मोठा सहभाग दिसून आला.
डॉल्बीच्या कर्णकर्कष आवाजामुळे बालके व वयोवृद्धांना अधिक त्रास होतो. पर्यावरणावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या मंडळाने यंदा डॉल्बीला फाटा देण्याचा संकल्प केला. यंदा गणपती विसर्जन मिरवणूक लेझीम खेळाच्या गजरात काढण्याचा निर्णय घेतला. अवघ्या चारच दिवसात गल्लीतील लहान बालकांसह तरुण-तरुणींना याची माहिती देऊन सराव करण्यास सुरुवात केली.
लेझीम मिरवणुकीसाठी गल्लीतील सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. लहान बालकांसह तरुणी व तरुणांनी या लेझीम खेळामध्ये सहभाग घेतला. उत्साहाने ते मिरवणुकीत लेझीम प्रात्यक्षिके सादर करताना दिसत होते. यामुळे या भागात ही मिरवणूक सर्वांसाठीच लक्षवेधी ठरली होती. स्वेच्छेने सर्वांनी पिंक व्हाईट रंगाचा कुर्ता परिधान केला होता. मिरवणुकीत लहान बालके लेझीम घेऊन नृत्य करत होती. भाविक मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करीत होते. संपूर्ण गावात तब्बल दहा तास ही मिरवणूक काढण्यात आली. या आगळय़ावेगळय़ा मिरवणुकीमुळे गल्लीतील तरुणांनी एक वेगळा संदेश समाजाला दिला आहे. संपूर्ण गावात गणपती मिरवणूक काढल्यानंतर गावाजवळील तलावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









