शहर परिसरात शेवटचा श्रावण सोमवार उत्साहात : विविध धार्मिक कार्यक्रम, मंदिरांमध्ये फळा-फुलांची आरास
बेळगाव : शहर परिसरात शेवटचा श्रावण सोमवार उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने शिवमंदिरातून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पूजा अर्चा, अभिषेक, आरती, तीर्थप्रसाद, पालखी प्रदक्षिणा आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सकाळपासून महादेव मंदिरातून दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढली होती. यानिमित्ताने मंदिरांतून फळा-फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई करून सजविण्यात आली होती. कपिलेश्वर मंदिर, कॅम्प मिलिटरी महादेव मंदिर, बिस्कीट महादेव मंदिर, वडगाव शिवमंदिर, विजयनगर शिवमंदिर यासह इतर मंदिरांतून विविध कार्यक्रम झाले. त्यामुळे हर हर महादेवच्या जयघोषात शिवालये फुलून गेली होती. दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात रविवारी रात्री पंचामृत अभिषेक घालण्यात आला. सकाळी 6 पासून रुद्राभिषेक, त्रिकाल पूजा करण्यात आली. त्यानंतर धामणे येथील वारकरी भजनी मंडळाचे भजन झाले. सायं. 7 वा. पालखी प्रदक्षिणेनंतर महाआरती करण्यात आली.
कॅम्प मिलिटरी महादेव मंदिरात पूजा
कॅम्प येथील मिलिटरी महादेव मंदिरात पूजा अर्चा, अभिषेक आणि आरती करण्यात आली. त्याबरोबर कॅम्प बिस्कीट महादेव मंदिरात पूजा, रुद्राभिषेक, आरती आणि इतर धार्मिक कार्यक्रम झाले. काकड आरती, पूजा, अभिषेक आणि तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. वडगाव येथील मराठी शाळेसमोरील शिवमंदिरात शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त महाकाल रुपात फळांची आरास करून आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. यावेळी भक्तांच्या उपस्थित हर हर महादेवचा जयघोष करून पूजा, अर्चा व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले.









