प्रतिनिधी/ पणजी
वीज बिलांवर सरकार 20 पैसे ते 70 पैशांपर्यंत अतिरिक्त ड्युटी लागू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना लवकरच वाढीव दराने भरमसाट बिले येणार आहेत. घरगुती कारणासाठी वीज वापरणाऱ्यांना आणि व्यावसायिक तत्त्वावर वीज वापरणाऱ्यांनाही हा नवीन दर लागू केला जाणार आहे. ही दरवाढ तत्काळ लागू केली जाणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे. महसूल तूट भरून काढण्यासाठी भरमसाट कर वाढिवणे हा मार्ग जवळजवळ सत्तेवरील सरकार पत्करतात. विद्यमान सरकारनेही नेमके तेच केले आहे.
मागील एप्रिलमध्ये वीजदरवाढ लागू करण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा लोकांकडून कडवा विरोध झाला होता. राज्याच्या वीज विभागाने वीजदरात अधिसूचित केलेल्या 5.2 टक्के दरवाढीला संयुक्त विद्युत नियामक आयोगाने (जेआरसी) मंजुरी दिली होती. वीजदरातील सरासरी दरवाढ 1 एप्रिलपासूनही लागू करण्यात आली होती. ही लागोपाठ दुसरी वीज दरवाढ असून वीज बिले 20 टक्क्यांनी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या वर्षीच्या सुऊवातीला ग्राहक आणि विरोधी पक्षांनी सरकारी योजनेवर टीका केली असतानाही, महसुलातील तफावत भरून काढण्यासाठी राज्य सरकारने वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला होता, असे सांगण्यात येत आहे.









