पालकमंत्री जारकीहोळी, रामतीर्थनगरात नूतन सभागृहाचे उद्घाटन : मठ-मंदिरांचा वापर शैक्षणिक उपक्रमांसाठीही व्हावा
बेळगाव : शिवालयाच्या सभागृहाचा सामाजिक कार्यासाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी, शैक्षणिक उपक्रमासाठी वापर व्हावा. समुदाय भवन उभारण्यासाठी आम्हीही सहकार्य करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. येथील रामतीर्थनगरातील शिवालयाचा (शिवमंदिर) 19 वा वार्षिकोत्सव तसेच शिवालयाच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम बुधवारी झाला. याप्रसंगी मंत्री जारकीहोळी बोलत होते. या भागातील विद्यार्थ्यांना केएएस, आयएएससारखे उच्चश्रेणीचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षणाला महत्त्व दिले तरच विद्यार्थी जीवनामध्ये प्रगती करू शकतात, असे पालकमंत्री म्हणाले. मठ-मंदिरे ही केवळ पूजा-पाठसाठी मर्यादित न राहता शैक्षणिक उपक्रमासाठीही त्यांचा वापर झाला पाहिजे.
शैक्षणिक क्षेत्रासाठी विशेष काळजी घेतलेले मंत्री जारकीहोळी यांनी या भागातील शाळांच्या विकासासाठी परिश्रम घेत आहेत. त्यांच्या मुलांनीही वडिलांप्रमाणेच कार्य चालविले असल्याचे हुक्केरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी म्हणाले. शिवालयाचे सभागृह धार्मिक, सांस्कृतिक, सभा-समारंभांसाठी उपयोगी ठरणार आहे. सभागृहाच्या विकासासाठी आपणही सहकार्य करू, असे खासदार जगदीश शेट्टर म्हणाले. त्यानंतर समर्थनम संस्थेचे अध्यक्ष महांतेश किवडसण्णवर, मंत्री एच. के. पाटील, मंत्री के. एच. मुनियप्पा, केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाला भाजप नेते शंकरगौडा पाटील, माजी आमदार अनिल बेनके, शिवालय विश्वस्त समितीचे अध्यक्ष एस. एस. किवडसण्णवर, राजशेखर कोषावर, इरण्णा मदवाल, एस. एन. पुजारी, महेश मावीनकट्टी यांसह रामतीर्थनगर रहिवासी संघाचे सदस्य, शिवालयाचे सदस्य आदी उपस्थित होते.









