येत्या काही महिन्यात भुयारी मार्ग पूर्ण होणार; भुयारी मार्गाने मुख्य इमारतीपर्यंत जाता येणार
अहिल्या परकाळे कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठातून भुयारी मार्ग व्हावा यासाठी 2005 पासून महाराष्ट्र शासनाकडे विद्यापीठाकडून पाठपुरावा सुरू होता. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील आर्थिक सहाय्य निधीतून भुयारी मार्गाला निधी मंजूर केला आहे. या भुयारी मार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असून 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गामुळे दुचाकीचालकांचा प्रवास सुकर होणार असून, अपघाताचा धोकाही टळणार आहे. या भुयारी मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण होत असून लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल.
भुयारी मार्गाच्या कामाची जबाबदारी शिवाजी विद्यापीठातील इंजिनिअरिंग विभागाकडे सोपवली आहे. या मार्गाची रूंदी साडेसात तर उंची साडेपाच फुट आहे. या मार्गाने अवजड वाहनांच्या वाहतुकीला परवानगी नाही. परंतू दुचाकीस्वार भुयारी मार्गाने जाणार असल्याने मुख्य रस्तयावरील वाहतुकीला अडथळा होणार नाही. भुयारी मार्गाच्या पूर्वेकडील भाग पूर्ण झाला असून पश्चिमेकडील भागाचे काम सुरू आहे. विद्यापीठातील दुचाकी वाहन भुयारी मार्गाने गेले तर ते सरनोबतवाडी नाक्याला निघणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना कागलकडून येणाऱ्या व कागलकडे जाणाऱ्या वाहणांचा त्रास होणार नाही. तसेच सर्व नवीन अधिविभागांच्या इमारती विद्यापीठ मुख्य इमारतीच्या पुर्व भागात आहेत. यामध्ये कॉमर्स अॅन्ड मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, यशवंतराव चव्हाण रूरल डेव्हलपमेंट, तंत्रज्ञान अधिविभाग, मास कम्युनिकेशन अॅन्ड जर्नालिझम, राजर्षी शाहू संशोधन केंद्र, शिक्षणशास्त्र विभाग, इतिहास विभाग यासह अन्य अधिविभागांचा समावेश आहे. या विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना भुयारी मार्गाने थेट विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ येता येणार आहे. त्यामुळे पूर्व दिशेला असणाऱ्या अधिविभागांच्या विद्यार्थी, शिक्षक कर्मचाऱ्यांना वाचनालय, मुख्य इमारत व परीक्षा भवनला येण्यासाठी भुयारी मार्ग सोयीचा ठरणार आहे. कितीही पाऊस पडला तरी राजाराम तलावात पाणी जाण्यासाठी नैसर्गिग स्त्रोत असल्याने भुयारी मार्गात पाणी साटणार नाही. संबंधीत मार्गावर पडलेल्या पावसाचे पाणी राजाराम तलावात जाण्यासाठी स्वतंत्र गटारीची व्यवस्था केली आहे. त्यामुळे भुयारी मार्गावर वाहतुकीला कोणताही अडथळा येणार नाही. हा मार्ग कधी सुरू होणार याकडे विद्यापीठातील प्रत्येक घटकाचे लक्ष लागले आहे.
विद्यापीठाच्या पाठपुराव्याला यश
शिवाजी विद्यापीठात 48 अधिविभागाचे वर्ग सुरू होताना व सुटल्यानंतर कागल रोडला वाहनांची गर्दी होते. येथे अनेकता वाहनांचे अपघातही झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन राज्य शासनाकडे वारंवार भुयारी मार्गाचे काम करण्याची मागणी करीत होते. विद्यापीठाच्या तब्बल 19 वर्षाच्या पाठपुराव्याला यश आले असून भुयारी मार्गाचे काम सुरू झाले आहे. येत्या काही महिन्यात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. परिणामी कागलकडे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहणांचा भुयारी मार्गाला अडथळा होणार नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना विद्यापीठात येणे-जाणे सोपे होणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुयारी मार्गाचे काम मनावर घेवून निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून मंत्री पाटील यांचे आभार मानत त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भुयारी मार्गाचे कामही विद्यापीठातील इंजिनिअरिंग विभागाने आपल्याकडे घेवून आर्धे काम पूर्ण करूनही दाखवले.