असंख्य शिवप्रेमींच्या उपस्थितीत स्वागत : आज शिवपुतळा हुबळीकडे
प्रतिनिधी/ बेळगाव
जपानची राजधानी टोकियो येथे स्थापित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शनिवार दि. 18 रोजी बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आगमन झाले. त्या ठिकाणी उपस्थित शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्रीराम सेना हिंदुस्थान, म. ए. समिती, शिवप्रेमी, त्याचबरोबर शहरातील पंचम मंडळींनी पुतळ्याचे उत्स्फूर्त स्वागत करून पूजन केले.
जपानची राजधानी टोकियो येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. मुंबई येथील मूर्तिकार विवेक खटावकर यांनी तो साकारला आहे. सदर शिव रथयात्रेची सातारा येथून सुऊवात झाली आहे. शनिवारी शिव रथयात्रा बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात दाखल झाली. त्यामुळे म. ए. समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्रीराम सेना हिंदुस्थान, शिवप्रेमी व पंच मंडळींच्यावतीने पूजन व स्वागत करण्यात आले. शिवाजीराव हंगीरकर यांच्या हस्ते पूजन करून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे किरण गावडे आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुसकर यांनी शुभेच्छा दिल्या. हणमंत जाधव यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली. शिव रथयात्रा देशातील बारा राज्यांमध्ये फिरणार आहे.
शनिवारी सायंकाळी बेळगावात दाखल झालेला शिवाजी महाराजांचा पुतळा गोवावेस येथील मराठा मंगल कार्यालयात ठेवण्यात आला असून रविवारी सकाळी धर्मवीर संभाजी महाराज चौकात पूजन करून ही शिव रथयात्रा हुबळीला रवाना होणार आहे. यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, प्रकाश मरगाळे, अंकुश केसरकर, मालोजी अष्टेकर, अभिजीत अष्टेकर, सुनील मुरकुटे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.









