छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन; जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात रात्रीची मशाल रॅली
सातारा : शिवसेनेच्या ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. नाव ही शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे असे असुन या नव्या चिन्हबाबत निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर सातारच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी विजयी संकल्प मशाल रॅली काढली. धगधगत्या मशालीसोबत संपुर्ण सातारा शहराला प्रदक्षिणा घालण्यात आली. उद्धव ठाकरे यांचया गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले आहे तर पक्ष चिन्ह पेटती मशाल मिळाले आहे. या वेळी जिल्हा उपप्रमुख दत्ताभाऊ नलावडे, शहर उपप्रमुख गणेश अहिवळे, शहर संघटक सादिक बागवान, सुमित नाईक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत दत्ताभाऊ नलावडे यांच्या हस्ते मशाल पेटवून सातारा शहरातील शाहू चौक, राजपथ, पोलीस मुख्यालय मार्ग अशी प्रदक्षिणा घालण्यात आली.
ही विजयी संकल्प मशाल अंधेरीच्या निकलपर्यंत धगधगत ठेवणार
शिवसेना हा पक्ष हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 56 वर्षांपूर्वी स्थापन केली. शिवसेना हा एक विचार आहे. ही एक चळवळ आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारा पक्ष आहे. मशालीने क्रांतीची विचारधारा आम्ही निष्ठावंत शिवसैनिक पेटती ठेवणार आहोत.अंधेरी पोट निवडणूक निकाल लागेपर्यंत ही मशाल आम्ही साताऱ्यात पेटती ठेवणार आहोत, अशी माहिती उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी दिली आहे.