ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेनेच्या आमदारांना अपात्रतेसंदर्भात आपलं म्हणणं मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस पाठवली आहे. अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी या आमदारांना पुराव्यासह 27 तारखेपर्यंत आपलं म्हणणं मांडायचं आहे. मात्र, शिवसेना शिंदे गट त्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ वाढवून मागणार आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या नोटीससंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, 7 जुलै 2023 रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना नोटीसा काढण्यात आल्या. आमदार अपात्रेतसंदर्भातील कारवाई टाळण्यासाठी आम्हाला 27 जुलैपर्यंत नोटीसांना उत्तर देण्यास सांगितले आहे. शुक्रवारी काढलेली ही नोटीस आम्हाला सोमवारी प्राप्त झाली. कायदेशीर सल्ला मसलत करण्यासाठी आम्ही मुदतवाढ मागणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं यासाठीची ठाकरे गटाची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल आहे. सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांकडून विशिष्ट वेळेत यासंदर्भातील याचिका निकाली काढणं बंधनकारक आहे. त्यासाठी नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमुळे शिंदे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
निवडणूक आयोगाकडून विधीमंडळास शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त झाली आहे. या घटनेचा अभ्यास करून लवकरच विधीमंडळ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेणार आहे. अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी दोन्ही गटातील आमदारांना पुरावे सादर करत आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे.








