ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिंदे गटाने केंद्रात दोन मंत्रिपदं आणि दोन राज्यपालपदं मिळावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. शिंदेंच्या या मागणीवर अमित शाह आज अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कोणत्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात सामील झालेले नेते गजानन कीर्तिकर आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. केंद्रीय मंत्रिपद मिळण्याच्या इच्छेपोटीच कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. याआधीही शिंदे गटाने केंद्राकडे मंत्रिमंडळात पदं मागितली होती. त्यामुळे शाह यांच्या निर्णयाकडे ठाकरे गटाचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्रात थंडी वाढणार
सोमवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकही पार पडली होती. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा हे समजू शकले नव्हते. दरम्यान, सत्तांतरानंतर शिंदे गटात इन्कमिंग सुरूच आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.