पुणे / प्रतिनिधी :
आमदार फुटण्याच्या भीतेतूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मध्यावधी निवडणुकीची हवा तयार केली जात आहे. मात्र, राज्यातील सरकार स्थिर असून, ते आपला अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता व्यक्त केली आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडूनही सरकार लवकरच कोसळेल, असे भाकीत वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात आले असता ते बोलत होते. डॉ. कराड म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते मध्यावधी निवडणुकीचा दावा करत आहेत. खरे तर त्यामागचे कारण वेगळे आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांचे उरलेले आमदार फुटण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे हे आमदार पक्ष सोडून कोठेही जाऊ नये, याकरिताच अशा वावडय़ा उठविल्या जात आहेत.
अधिक वाचा : …तर गाठ माझ्याशी, संभाजीराजेंचा चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांना इशारा
भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सरकार पडेल, अशी विधाने करणे, हे केवळ दिवास्वप्न आहे. प्रत्यक्षात तसे काही होणार नाही. उलट गेली अडीच वर्षे राज्यातील विकास ठप्प झाला होता. आता आमचे सरकार आल्यानंतर विकास पुन्हा वेगात सुरू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकांमध्ये जाऊन काम करत आहेत. त्यामुळे या सरकारला कोणताही धोका नाही. आम्ही अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू.








