आरपीडी कॉर्नरवरील समस्येचे निवारण करण्यासाठी घातली होती वाहिनी : समस्या जैसे थे, त्वरित दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी/बेळगाव
आरपीडी कॉर्नर परिसरात साचणाऱया सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिका आणि स्मार्टसिटी कंपनीकडून वाहिनी घालून उपाययोजना राबविण्यात आली होती. मात्र सदर समस्येचे निवारण करण्यासाठी राबविण्यात आलेली उपाययोजना अपयशी ठरली आहे. आरपीडी कॉर्नरवरील सांडपाण्याचा खड्डा भरून पुन्हा मुख्य रस्त्यावरून सांडपाणी वाहू लागले आहे. त्यामुळे सांडपाण्याची समस्या जैसे थे आहे.
स्मार्टसिटी योजनेअंतर्गत आरपीडी रोडचा विकास करण्यात आला असून रस्त्याशेजारी गटारीचे बांधकाम, रस्त्याचे काँक्रीटीकरण, दुभाजक, फुटपाथ आणि डेकोरेटिव्ह पथदिपांची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. पण गटारीमधून वाहणाऱया सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे आरपीडी कॉर्नरवर खड्डय़ामध्ये सांडपाणी साचत आहे. मुख्य रस्त्याशेजारी असलेला खड्डा तुडूंब भरला असून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे.
खानापूर रोडवर मोठय़ाप्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच कॉलेजला ये-जा करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ाप्रमाणात आहे. त्यामुळे सांडपाण्याचा त्रास रस्त्यावरून ये-जा करणाऱयांना सहन करावा लागत आहे. तसेच दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे पादचाऱयांच्या अंगावर उडत आहे. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
समस्येचे निवारण कोण करणार?
याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी खड्डय़ापासून डेनेज चेंबरपर्यंत वाहिनी घालण्यात आली. पण सध्या पावसाचा जोर वाढला असून खड्डय़ामधील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. स्मार्टसिटी कंपनीकडून राबविलेली उपाययोजना अपयशी ठरली असून पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी खड्डय़ात सांडपाणी साचून मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनधारकांना सांडपाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. रस्त्याच्या विकासाचे काम स्मार्टसिटी कंपनीकडून करण्यात आले असल्याने महापालिका प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सदर समस्येचे निवारण कोण करणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिका आणि स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱयांच्या कारभाराबाबत नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील रस्त्यावरून वाहणाऱया सांडपाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.









