तिरुअनंतपुरम:
केरळ विधानसभेचे अधिवेशन 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. चंडी यांचे मागील महिन्यात बेंगळूर येथे निधन झाले हेते. 5 दशकांपेक्षा अधिक कालावधीत पहिल्यांदाच सभागृहात चंडी नसणार आहेत. चंडी यांनी 53 वर्षांपासून कोट्टायम जिल्ह्यातील पुथुपल्ली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. विधानसभेच्या या अधिवेशनात अनेक विधेयके मांडली जाणार असून यात आरोग्य सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून जारी अध्यादेशाचा पर्याय देखील सामील आहे. तसेच सभागृहात राज्याच्या आर्थिक संकटासमवेत डाव्या सरकारशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफकडून राज्यातील महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या विरोधात होणाऱ्या गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणाचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. केरळमधील आर्थिक संकटासाठी सत्तारुढ माकप केंद्र सरकार आणि त्याच्या आर्थिक धोरणांना जबाबदार ठरवू पाहत आहे. तर राज्य प्रशासन अत्याधिक खर्च करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जाऊ शकतो.









