गृहलक्ष्मी नोंदणीसाठी पैसे आकारल्याचा ठपका
बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणीसाठी वेगवेगळ्या सेवा केंद्रांवर पैसे उकळण्याचे प्रकार सुरूच आहेत. बेळगाव येथील चव्हाट गल्ली, अथणी तालुक्यातील अवरखोड पाठोपाठ आता आणखी एका सेवा केंद्राला टाळे ठोकले आहेत. चिंचली, ता. रायबाग येथील एका कॉम्प्युटर ऑपरेटरवर एफआयआर दाखल केला आहे. गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणीसाठी सेवा केंद्रांवर पैसे घेऊ नये, अशी सक्त सूचना महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे. ही योजना पूर्णपणे नि:शुल्क असून नोंदणीसाठी कोणाकडूनही पैसे न घेण्याचा सूचना झिडकारून अनेक सेवा केंद्रांवर मनमानी वसुली सुरू आहे. त्यामुळे अशा सेवा केंद्रांना टाळे ठोकण्याचे कामही प्रशासनाने हाती घेतले आहे. चिंचली येथील ग्रामवन केंद्रातील कॉम्प्युटर ऑपरेटर अजित शंकर इदली याच्यावर हारुगेरी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केले आहे. गृहलक्ष्मी योजनेसाठी नोंदणीसाठी आलेल्या सुशिला काळू कांबळे, रा. चिंचली यांच्याकडून शंभर रुपये घेतल्याच्या आरोपावरून कॉम्प्युटर ऑपरेटरवर भादंवि 406, 420 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









