वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताचा आव्हानवीर डी. गुकेश याने पुन्हा एकदा गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेन याच्याशी बरोबरी साधली असून शनिवारी सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील 10 वा सामनाही अनिर्णीत राहिला. गुकेशसाठी काळ्या सोंगाट्यासह खेळताना हा सर्वांत सोपा सामना ठरला.
लंडन सिस्टम गेमचा अवलंब करताना डिंग लिरेनने कोणतीही जोखीम घेतली नाही आणि तो सामना बरोबरीत सुटल्याबद्दल आनंदित दिसला. ही लढतीतील सलग सातवी बरोबरी आणि एकंदरित आठवी बरोबरी असून ताज्या निकालाने दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 5 गुणांच्या समान स्तरावर आणून सोडले आहे. लढत जिंकण्यासाठी आणखी 2.5 गुणांची गरज आहे.
दोन्ही खेळाडूंनी 36 चालींनंतर सामना बराब्sारीत सोडविण्याचे मान्य केले. 2.5 दशलक्ष डॉलर्स बक्षीस रकमेच्या या लढतीत आता फक्त चार क्लासिकल सामने खेळायचे बाकी आहेत. निर्धारित 14 फेऱ्यांनंतरही चित्र बदलले नाही आणि बरोबरी कायम राहिली, तर विजेता निश्चित करण्यासाठी वेगवान वेळेच्या नियंत्रणाखाली सामने होतील.
लिरेनने सुरुवातीचा सामना जिंकला होता, तर 18 वर्षीय गुकेशने तिसऱ्या गेममध्ये विजय मिळवला होता. लिरेनने सुरुवातीला लंडन सिस्टमचा वापर करणे चालू ठेवले आणि यावेळी त्यात थोडासा बदल केला. ही रणनीती एरव्ही कामी आली असती, पण गुकेशने पारडे समपातळीवर असलेल्या स्थितीतून बाहेर पडण्याचा एकदाही प्रयत्न न करण्याचा निर्णय घेतला.









