मडगावातील पिकअप स्थानकाच्या नजीक प्रकार, पादचाऱयांना धोका, उपाययोजनेची मागणी
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पिकअप स्थानकाच्या नजीक असलेल्या सुलभ शौचालयाच्या सेप्टिक टँकचा वरील भाग मागील काही दिवसांपासून खचला असून त्याला तडे गेल्याने तो कधीही कोसळण्याची शक्मयता आहे. त्यामुळे येथील पॅसेजचा ये-जा करण्यासाठी वापर करणाऱया पादचाऱयांसाठी ते धोकादायक बनले आहे. मडगाव पालिका वा संबंधित सरकारी अधिकारिणीने याची दखल घेऊन उपाययोजना आखावी, अशी मागणी मडगाववासियांकडून होत आहे.
सदर सुलभ शौचालयाच्या सेप्टिक टँकला काही दिवसांपूर्वी काही भागाला तडे जाऊन तो खचला होता. त्यावर उपाय म्हणून तुटलेला दरवाजा व काही फरशा त्यावर ठेवल्या होता. पावसाची संततधार सुरू असल्याने सोमवारी रात्री तो भाग अधिकच खचला. त्यानंतर सुलभ शौचालय चालविणाऱयांनी किंवा अन्य कोणी तरी त्यावर झाडाच्या फांद्या घालून भगदाड पडलेला भाग झाकून ठेवला आहे. मात्र हे धोकादायक आहे. ज्यांना याची माहिती नाही ते लोक या पॅसेजमधील वाटेचा ये-जा करण्यासाठी वापर करत असतात. कारण या पॅसेजमधून पिकअप स्थानक ते न्यू मार्केट अशी शॉर्टकटने ये-जा करता येते.
न्यू मार्केटमधील कित्येक व्यापारी व कामगार सदर शौचालयाचा वापर करत असतात. या शौचालयाला भिडून असलेल्या पॅसेजचा भाग सदर सेप्टिक टँकवरून जातो. त्यामुळे तो खचला असल्याचे काहींच्या लक्षात येत नाही. म्हणून येथे एखादी दुर्घटना घडून एखाद्याचा जीव जाण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.
या भागातून भू-गटार वाहिनी गेली असून सुलभ शौचालयाने त्याची जोडणी घेतलेली असल्यास सदर सेप्टिक टँक वापरात नाही म्हणून सुलभ शौचालय चालविणारे आपली जबाबदारी झिडकारू शकत नाहीत. त्यांनी पालिका व संबंधित अधिकारिणीपुढे सदर प्रकार मांडून आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. पालिकेचे कामगार, पर्यवेक्षक व मार्केट निरीक्षक जे फिल्डवर काम करतात त्यांचे अशा गोष्टींकडे लक्ष असायला हवे. त्यांनी पालिकेच्या संबंधित विभागाच्या नजरेस सदर बाब आणून देण्याची गरज येथील एका दुकानदाराने व्यक्त केली. स्थानिक नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर कवळेकर यांनी या प्रकरणी लक्ष घालून त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.









