पुलवामानंतर 10 दिवसांनी होणार होता दुसरा हल्ला ः दहशतवाद्यांचा खात्मा करत उधळला कट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथील हल्ल्यानंतरच्या 10 दिवसांमध्ये आणखी एक आत्माघाती हल्ला दहशतवाद्यांकडून घडवून आणला जाणार होता. याचा सुगावा भारतीय सैन्याला लागला होता. यानंतर सुरक्षा दलांनी दोन पाकिस्तानींसमवेत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालत हा घातपाती कट उधळून लावला होता असा खुलासा चिनार कॉर्प्सचे माजी कमांडर लेफ्टनंट जनरल (निवृत्त) केजेएस ढिल्लन यांनी स्वतःचे पुस्तक ‘कितने गाजी आए, कितने गाजी गए’मध्ये केला आहे.
अशा अनेक आत्मघाती हल्ल्यांबद्दल लोक जाणत नाहीत, ज्यांचा कट फेब्रुवारी 2019 मध्येच रचण्यात आला होता. एका दहशतवाद्याने स्वतःच्या आत्मघाती हल्ल्यापूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता, ज्यात तो स्फोटके आणि अन्य शस्त्रास्त्रांसह दिसून आला होता. याच इनपूटच्या आधारावर सुरक्षा दलांनी संयुक्त मोहीम राबवून आत्मघाती हल्ल्याचा कट हाणून पाडला होता असे ढिल्लन यांनी पुस्तकात नमूद केले आहे.
पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी हल्ला झाला होता. यात एका आत्मघाती हल्लेखोराने स्वतःचे वाहन सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला नेऊन धडकविले होते. या हल्ल्यात 40 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते आणि अनेक जण जखमी झाले होते. पुलवामा येथील हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रणा, जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय सैन्याने स्वतःच्या मोहिमेला वेग दिला होता. दक्षिण काशमीर भागात जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांच्या नेटवर्कमध्ये शिरकाव करण्यास आम्ही बऱयाचअंशी यशस्वी ठरलो होतो असे ढिल्लन यांनी स्वतःच्या पुस्तकात म्हटले आहे.
सुरक्षा यंत्रणांची संयुक्त मोहीम
सुरक्षा यंत्रणा सातत्याने काम करत होत्या आणि तुरीगाम गावात जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपून हल्ल्याचा कट रचत होते. सैन्य आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी 24 फेब्रुवारी 2019 च्या रात्री एक संयुक्त मोहीम राबविली. ही मोहीम अयशस्वी होऊ न देण्याची खबरदारी घेण्यात आली, अन्यथा आणखी एक आत्मघाती हल्ला झाला असता. संयुक्त पथकाने मोहीम राबवून तीन दहशतवाद्यांना घेरले होते. याचदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. जम्मू-काश्मीर पोलीस विभागाचे उपअधीक्षक अमन कुमार ठाकूर यांनी स्वतःच्या सुरक्षेची पर्वा न करता एका जखमी सैनिकाला सुरक्षितस्थळी हलविले होते. याचदरम्यान एक गोळी लागल्याने ठाकूर स्वतः जखमी झाले होते. जखमी असूनही ठाकूर यांनी दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते. पाकिस्तानचा रहिवासी नोमान असे या दहशतवाद्याचे नाव होते असे ढिल्लन यांनी म्हटले आहे.
शौर्यचक्राने सन्मानित
पुस्तकात 34 आरआरचे अधिकारी सोमवीर यांच्या शौर्याचे कौतुक करण्यात आले आहे. सोमवीर यांनी पाकिस्तानी दहशतवादी ओसामाला आमने-सामनेच्या गोळीबारात ठार केले होते. तर यादरम्यान गोळी लागल्याने सोमवीर यांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. उपअधीक्षक ठाकूर यांनी सोमवीर या दोघांनीही मोहिमेत सर्वोच्च बलिदान केले होते. दोघांनाही शौर्यचक्राने (मरणोत्तर) गौरविण्यात आले होते.









