एका आईस्क्रीमच्या किमतीत कार घेता येणार
उन्हाळा सुरू असल्याने बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम उपलब्ध होत आहेत. लहान मुलांसह मोठ्या माणसांनाही आईस्क्रीम हवेहवेसे वाटत असते. आईस्क्रीमच्या किमतीही वेगवेगळ्या असतात. काही आईस्क्रीम 5-10 रुपयांमध्ये मिळतात तर काही आईस्क्रीमची किंमत 500 रुपयांपर्यंत असते. जगात एक असे आईस्क्रीम आहे, जे केवळ धनाढ्या व्यक्तीच खरेदी करू शकतो. कारण हे आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी सर्वसामान्यांना कर्ज घ्यावे लागू शकते. याच्या किमतीत एक उत्तम कार विकत घेता येते.

मागील महिन्यात एका नव्या आईस्क्रीमने जगातील सर्वात महाग आईस्क्रीम होण्याचा मान मिळवत जुना विक्रम मोडीत काढला आहे. जपानच्या आईस्क्रीम कंपनी सिलाटोने ब्याकुया नावाचे आईस्क्रीम सादर केले आहे, हे नवे प्रोटीननेयुक्त आईस्क्रीम जगातील सर्वात महाग आईस्क्रीम ठरले आहे.
या आईस्क्रीमचा वेलवेटी बेस असतो, जो दूधाने तयार होतो. याचबरोबर पॅर्मिगियानो चीज, व्हाइट ट्रुफल ट्रुफल ऑयल इत्यादी अनेक गोष्टींनी हे आईस्क्रीम तयार होते. तसेच ते स्टायलिश ब्लॅक बॉक्समध्ये दिले जाते आणि याच्यासोबत हाताने तयार करण्यात आलेला मेटल स्पूनही देण्यात येतो. हा स्पून क्योटोचे काही क्राफ्ट्समॅन विशेष तंत्रज्ञानाद्वारे तयार करतात.
कंपनीच्या वेबसाइटवर 130 एमएल ब्याकुया आईस्क्रीमची किंमत 6700 डॉलर्स म्हणजेच 5 लाख रुपयांपेक्षा अधिक नमूद करण्यात आली आहे. आईस्क्रीमसोबत देण्यात येणारा स्पूनच महाग असल्याने याच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या आईस्क्रीमची नोंद झाली आहे. हे आईस्क्रीम व्हाइट वाइनसोबत खाल्ल्यास अधिक स्वादिष्ट लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.









