जुन्या घरांचे नूतनीकरण करणे हे एक अवघड काम आहे. अनेकांना हा अनुभव असतो. जुनी घरे नवी करण्यापेक्षा नवेच घर घेणे बरे, असेही कित्येकांचे मत असते. तथापि, जुन्या घरांमध्ये काही रहस्ये दडलेली असतात. अशा घरांचे नूतनीकरण करताना काही अशा वस्तू हाताला लागतात की ज्या चर्चेचा विषय होतात. असाच अनुभव ब्रिटनमधील एका दांपत्याला आला आहे.
ब्रिटनमधील जेना हॉल आणि तिचे पती ब्रायंट यांनी 124 वर्षांपूर्वी बांधलेले एक घर विकत घेतले होते. अर्थातच ते सुधारणा केल्याशिवाय वास्तव्यायोग्य होणार नव्हते. म्हणून त्यांनी त्याच्या नूतनीकरणाच्या कार्याला प्रारंभ केला. नूतनीकरण करताना त्यांच्या हाती एक अशी वस्तू लागली की, जी आज एक रहस्य बनलेली असून अनेकांच्या चर्चेचा विषय झाली आहे. घराच्या जुन्या छतापाशी त्यांना एक लाकडी चौकट लागली. ती बऱ्याच वर्षांपूर्वीची असल्याने उपयोग करण्यासारखी राहिली नव्हती. ती टाकून द्यावी म्हणून जेना यांनी ती घराबाहेर नेली. तेव्हा, त्या चौकटीला चिकटवलेला एक कागद त्यांना दिसला. त्या कागदात काहीही दिसत नव्हते. मात्र, जेव्हा ती चौकट त्यांनी टाकण्यासाठी बाहेर सूर्यप्रकाशात नेली, तेव्हा तो साधा कागद नसून ते एक छायाचित्र आहे, हे त्यांना समजले. ते एक पोलाराईड छायाचित्र होते. अशा प्रकारचे छायाचित्र केवळ सूर्यप्रकाशातच दिसू शकते. त्या छायाचित्रात दोन बालके होती. ती नेमकी कोण होती, हे समजत नव्हते. म्हणून या दांपत्याने ते छायाचित्र इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. कदाचित हे छायाचित्र अनेक वर्षांपूर्वी या घरात जे कुटुंब रहात होते. त्यांच्या मुलांचे असू शकते, असे त्यांना वाटत आहे. त्यांनी शोध चालविला आहे.









