वृत्तसंस्था/ माऊंट माँगेनिओ
सध्या बांगलादेशचा क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून उभय संघात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत शुक्रवारचा दुसरा सामना पावसामुळे वाया गेला. या मालिकेत बांगलादेशने पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी मिळविली आहे.
शुक्रवारच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 11 षटकात 2 बाद 72 धावांपर्यंत मजल मारली असताना पावसाला प्रारंभ झाला. पंचांनी बराच वेळ खेळ थांबवला. दरम्यान मैदान आणि खेळपट्टी ओलसर असल्याने तसेच किरकोळ पावसाच्या सरी सुरू झाल्याने पंचांनी हा सामना रद्द केल्याची घोषणा केली. न्यूझीलंडच्या डावात सलामीच्या सिफर्टने 23 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 43 तर अॅलेनने 2 धावा जमविल्या. मिचेल 1 चौकारासह 18 तर फिलिप्स 9 धावावर नाबाद राहिला. बांगलादेशतर्फे एस. इस्लाम आणि टी. हसन शकीब यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.









