40-50 उमेदवारांची घोषणा शक्य
प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी निश्चित करण्यासाठी मंगळवारपासून नवी दिल्लीत खलबते सुरू आहेत. बुधवारी देखील काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. दुसऱ्या दिवशी 40 ते 50 मतदारसंघांमधील उमेदवार यादीला अंतिम स्वरुप देण्यात आले. गुरुवारी सकाळी पुन्हा पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून त्यानंतर 11 वाजता उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होणार आहे. राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी रात्री याविषयी माहिती दिली.
बुधवारी बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव रणदीप सुरजेवाला, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, राज्य काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील, माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर उपस्थित होते.
काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच 124 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यामुळे उर्वरित उमेदवारांची यादीविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे. संभाव्य उमेदवार यादीवर मंगळवारी चर्चा झाली. मात्र, अंतिम स्वरुप मिळू शकले नाही. बुधवारी दोघेजण इच्छुक असलेल्या 40 ते 50 मतदारसंघांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले.
उर्वरित मतदारसंघांसाठी राज्य काँग्रेसने प्रत्येकी दोनपेक्षा अधिक उमेदवार सूचविले आहेत. त्यामुळे राहुल वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यातील नेत्यांना धारेवर धरले. प्रत्येक मतदारसंघासाठी दोनच नावे सूचविण्याची सूचना दिली. त्यामुळे गुरुवारी सकाळी पुन्हा बैठक घेऊन पुन्हा एकदा चर्चा केली जाईल.
भाजपच्या उमेदवारांबाबतही उत्सुकता
भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा 8 एप्रिल रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने भाजपकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर आपली तिसरी यादी जाहीर करण्याचा विचार चालविल्याचे समजते. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणखी कुतूहल निर्माण झाले आहे.









